उद्धव ठाकरेंना मध्यावधीचे वेध गोड-गैरसमजुतीमुळे लागलेत!

132

दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मध्यावधीची शक्यता वर्तवली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहोचायला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तसेच आता ऋतुजा लटके अंधेरीतून निवडून आल्यानंतर ठाकरेंमध्ये हजार हत्तींचं बळ संचारलं आहे. “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे असं विधान ठाकरेंनी निकालानंतर केलं आहे.

मुळात मध्यावधी निवडणुका का व कशा लागतील? याबद्दल ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं नाही. त्यासाठी शिंदे गटातील लोक नाराज झाले पाहिजेत आणि सरकार अल्पमतात गेलं पाहिजे. परंतु ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेले लोक एवढा मोठा धोका का पत्करतील? रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वाक्‌युद्धामुळे मध्यावधी लागण्याची शक्यता कमीच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर भाष्य करताना सूचक विधान केलं होतं की आपापसातल्या संघर्षातून हे सरकार पडेल आणि झालंही तसंच.

भाजपच्या आमदारांमध्ये असंतोषाचं कारण नाही. आता असंतोष पसरला तर तो शिंदे गटात पसरु शकतो. परंतु या आमदारांनी खूप मोठी उडी घेतली आहे. त्यांनी आता शिंदेंना आपला नेता म्हणून स्वीकारलं आहे. राजकीय करिअर पणाला लागलं आहे. अशा परिस्थितीत कुणीही नाराज होण्याचा मूर्खपणा करणार नाही. मग उद्धव ठाकरेंना मध्यावधीची स्वप्ने का पडू लागली आहेत? याचं कारण त्यांना असं वाटू लागलं आहे की ते बाळासाहेबांपेक्षाही मोठे आहेत.

बाळासाहेब ठाकरे असतानादेखील शिवसेनेला स्वतःच्या बळावर राज्यात सत्ता मिळवता आली नाही. उलट भाजपने आपलं संघटन मजबूत केलं आणि भाजप मोठा भाऊ झाला. पण ठाकरे यांना असं वाटू लागलं आहे की ते काहीही करु शकतात, विशेषतः त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. पण मुख्यमंत्री होताना त्यांना शरद पवारांच्या मजबूत खांद्याची आवश्यकता पडली. शरद पवार नसते तर ठाकरे स्वप्नातदेखील मुख्यमंत्री होऊ शकले नसते. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात शिवसेना पक्ष चालला, तो बाळासाहेबांच्या पुण्याईवर. नाहीतर उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत विशेष पराक्रम गाजवलेला नाही.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो हवाच! )

परंतु समस्या अशी आहे की मी वर म्हटल्याप्रमाणे, उद्धव ठाकरे हे स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजतात म्हणून त्यांना असं वाटू लागलं आहे की ते शिंदेंचा पराभव सहज करु शकतात. इतकंच काय तर ते देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदींना देखील आव्हान देऊ शकतात. या दोन्ही नेत्यांची कारकीर्द स्वकर्तृत्वावर घडली आहे. म्हणजेच त्यांनी स्वतःचं आयुष्य घडवलं आहे. मोदींची तर राजकीय पार्श्वभूमी नव्हती. उद्धव ठाकरे एका राजकीय कुटुंबात जन्माला आले. त्यांचे आजोबा प्रभावी समाजसुधारक होते तर वडील हे प्रभावी नेते. त्यामुळे त्यांना आपणही प्रभावी असल्याचा साक्षात्कार झाला आहे. स्वतःला प्रभावी समजण्याने प्रभावी होता येत नाही, याची जाणीव ठाकरेंना नाही. त्यासाठी स्वबळावर कर्तृत्व गाजवावं लागतं. एकनाथ शिंदे यांना ते नोकर मानतात, मग याच माणसाने त्यांना पाणी पाजलं हे मात्र सविस्तर विसरतात. गद्दार बोलून काय होणार आहे? त्यांनी आपल्या नाकावर टिच्चून स्वतःचा एक वेगळा आणि आपल्यापेक्षा मोठा पक्ष स्थापन केला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

मुंबई व ठाणे महानगरपालिका गमावल्याशिवाय त्यांना या गोष्टीची जाणीव होणार नाही. कर्तृत्ववान व प्रभावी लोकांच्या घरी जन्म घेणं खरंच कठिण असतं. ज्येष्ठांचे कर्मचारी अथवा कार्यकर्ते बालपणापासून आपल्याला युवराज समजू लागतात. मग आपणही त्याच थाटात लहानाचे मोठे होतो. पण पूर्वीच्या काळी युवराजांनादेखील युद्धभूमीवर जाऊन पराक्रम गाजवावा लागत असे. आताही परिस्थिती फारशी वेगळी नाही. तुम्ही कर्तृत्व दाखवलं नाही, तर तुम्ही लोकांच्या दृष्टीकोनातून विस्मृतीत जाता. स्वतःबद्दलचा हा गोड गैरसमज खूप घातक असतो. स्वतःच्याच अधोगतीला कारणीभूत ठरतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.