सुषमा अंधारे ठाकरे गटाला बळ देतील की दुबळं करतील?

159

नारायण राणे आपल्या दोन्ही मुलांसोबत भाजपमध्ये आले आणि स्थिरावले. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळालं आणि नितेश राणे हे महाराष्ट्र भाजपमधील महत्वाचे नेते झाले. बाहेरुन आलेल्या नेत्यांना अनेक पक्षांत मानाचं स्थान प्राप्त होतं. त्या त्या नेत्यांच्या योग्यतेनुसार त्यांना ते स्थान प्राप्त होतंच. यामध्ये आपल्या पक्षाचा फायदा पाहिला पाहिजे. राणे आल्याने कोकण भाजपकडे राहिल आणि राणे ठाकरेंना काटें की टक्कर देऊ शकतात. आता हेच चित्र पाहायला मिळत आहे. परंतु एखाद्या नेत्यामुळे आपल्या पक्षाचा विशेष फायदा होणार नसला तरी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वानुसार त्या दुबळ्या नेत्याला आपल्या पक्षात घेऊन मानाचं स्थान दिल्याने पक्षातले अनेक जाणते नेते नाराज होऊ शकतात.

शिउबाठा मध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या पक्षात नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. याआधी उर्मिला मातोंडकर पक्षात आल्या होत्या. पण त्या मूळच्या अभिनेत्री असल्यामुळे राजकारणात त्यांना अजून गती मिळाली नाही. प्रियंका चतुर्वेदी यांना देखील मानाचं स्थान देऊन उद्धव ठाकरे यांनी चूक केली. कारण प्रियंका आल्यापासून शिवसेनेला त्यांचा एक रुपयाचादेखील फायदा झाला नाही. उलट प्रियंका चतुर्वेदी यांचंच पुनर्वसन झालं.

आता सुषमा अंधारेंना पक्षात मोठं स्थान प्राप्त झालं आहे. भुवया उडवून सतत बडबडणारे संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर ते काम ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना दिलं असल्याचं जाणवत आहे. कारण सुषमा अंधारे सतत बोलत असतात. त्या विरोधकांचा जहरी शब्दांत समाचार घेतात आणि असं केल्याने ठाकरे सुखावतात. पण प्रत्यक्षात सुषमा अंधारे यांच्या येण्याने पक्षाला काही लाभ होणार आहे का?

पक्षप्रमुखाचा इगो सुखावल्याने पक्ष वाढत नसतो. राजकारणात मान-अपमान सहन करायची ताकद असली पाहिजे. नाहीतर पुढील प्रवास कठीण होऊन बसतो. अंधारे भाषण जोरदार करतात. परंतु यापूर्वी त्यांनी निवडणूक लढलेली आहे आणि ४ अंकी मते देखील त्यांना मिळवता आली नाहीत. अंधेरीच्या निवडणुकीतदेखील अंधारेंचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. कारण ऋतुजा लटके यांचा विजय झाला असला तरी नोटाला दुसर्‍या क्रमांकाची मते आहेत. पण आत्मपरीक्षण करण्याची ठाकरेंची वृत्ती नाही. त्यांना आता मध्यावधीची स्वप्ने पडू लागली आहेत आणि त्यांचा असा विश्वास आहे की सुषमा अंधारे यांच्यासारखे नेते त्यांना विजय मिळवून देऊ शकतात.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो हवाच! )

एकतर आधीच त्यांचा पक्ष फुटला आहे, हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काही प्रभावी नेते उरले आहेत. त्यात आपला पक्ष मजबूत करायचा सोडून बाहेरुन आलेल्या लोकांचं वजन वाढवण्याचं काम ठाकरे करत आहेत. सुषमा अंधारे यांच्यामुळे महिला आघाडीत नाराजी आहे. सुषमा अंधारे यांची आधीची वक्तव्ये कार्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यांनी ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली होती, हिंदुत्वावर व हिंदू प्रतीकांवर घाणेरडी टीका केली होती. अशा परिस्थितीत अंधारे यांच्या येण्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची लक्षणे अधिक आहेत. सुषमाताई अंधारे ठाकरेंना आणखी अंधार दाखवणार, यात वाद नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.