राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याची दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे हे आज, सोमवारी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. हे दोन्ही युवा नेते एकाच वेळी औरंगाबाद दौऱ्यावर असल्याने यांच्यात चढाओढ सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून औरंगाबादमध्ये पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे बॅनरवरचा आशय
राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. अशा स्वरूपाच्या आशयाचे बॅनर सध्या औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष आज औरंगाबादकडे लागून राहिले आहे. दोन्ही युवा नेते नेमके काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – बुर्ज खलिफाजवळील ३५ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव)
दरम्यान, या दोन्ही युवा नेत्यांच्या दौऱ्याची वेळ एकच आहे. दुपारी सोमवारी चार वाजता हे नेते नागरिकांशी संवाद साधणार आहे. श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून जंगी तयारी करण्यात आले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर त्यांची सिल्लोडमध्ये सभा असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ऐनवेळी श्रीकांत शिंदेंची सभा आयोजित केल्याने आदित्य ठाकरेंची सभा रद्द झाल्याचा आरोप शिंदे गटातर्फे करण्यात आला होता.