‘…तर मी खेद व्यक्त करतो’, सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानावरुन सत्तारांची प्रतिक्रिया

158

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तार यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. यानंतर आता सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

…तर मी खेद व्यक्त करतो

मी विधान करताना महिला-भगिनींच्या बद्दल कोणताही अपशब्द काढलेला नाही. जे आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबाबत मी वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना त्यांचा अपमान करण्यासारखं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. त्यामुळे महिला-भगिनींना जर वाटत असेल की माझ्या बोलण्यामुळे त्यांचा अपमान झाला असेल तर मी त्याबाबत खेद व्यक्त करतो, असे अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मी महिलांचा आदर करतो

मी फक्त खोक्यांबाबत बोललो होतो. ज्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते खोक्यांबाबत बोलत आहेत,असे मा म्हटले होते. पण त्याचा चुकीचा अर्थ काढून मी महिलांचा अपमान करत असल्याचे बोलले जात आहे. महिलांबाबत कोणताही चुकीचा शब्द मी कधी काढला नाही आणि यापुढेही काढणार नाही. सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदार हे महिलांचा आदर करणारे आहेत, तसाच मी ही महिलांचा आदर आणि सन्मान करणारा कार्यकर्ता असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पन्नास खोके तुम्हाला सुद्धा मिळाले आहेत का, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर टीका केली होती. यावरुन तुम्हालाही खोके हवे आहेत का? असा उलट सवाल सत्तार यांनी सुळेंना केला. त्यावेळी तुमच्याकडे 50 खोके असतील म्हणून तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असा टोला सुळे यांनी लगावला. त्यावरुन टीका करताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.