रेल्वेच्या कँटीन ठेकेदारांकडून प्रवाशांची होणारी लूट समाजमाध्यमातून समोर येताच, ‘रेल नीर’ या पाण्याच्या बाटलीसाठी केवळ पंधरा रुपयेच द्यावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल व इतर माध्यमातून प्रवाशांना करण्यात आले आहे. दरम्यान १५ रुपये किमतीचे ‘रेलनीर’ २० रुपयांना विकणाऱ्या लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथील कँटीन ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
( हेही वाचा : ‘चला जाणूया नदीला’… सरकारच्या अनोख्या उपक्रमाला सुरूवात!)
मुंबई तसेच बाहेरील रेल्वे स्थानकांवर बहुतांश रेल्वे कँटीनमध्ये मिळणारे पदार्थ तसेच मिनरल वॉटर हे रेल्वे प्रशासनाकडून ठरवून देण्यात आलेल्या किमतींपेक्षा जास्त दरात विकून कँटीन ठेकेदाराकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. प्रवासाची घाई असल्यामुळे अनेक प्रवासी कॅंटीन कर्मचाऱ्यांसोबत वाद न घालता निघून जातात. याचाच फायदा कॅंटीन कर्मचारी आणि ठेकेदार घेतात आणि चढ्या दराने पदार्थांची विक्री केली जाते. असाच काहीसा प्रकार लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे घडला हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात,सर्वात जास्त प्रवासी हे उत्तर प्रदेशात जाणारे आहेत.
कुर्ला रेल्वे टर्मिनस अर्थात लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनसवर असलेल्या रेल्वे कँटीनमध्ये कर्मचारी १५ रुपये किमतीचे ‘रेल नीर’ २० रुपयांना विकतात, तसेच इतर पदार्थ देखील चढ्या भावाने विकतात. प्रवाशांनी बिल मागितल्यावर कर्मचारी बिल देण्यास टाळाटाळ करतात. हा सर्व प्रकार समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून समोर आला आहे.
‘या व्हिडिओ मध्ये एक प्रवासी दोन रेलनीर पाण्याच्या बाटल्या घेतो, कँटिन कर्मचाऱ्याने संबंधित प्रवाशाकडून दोन पाण्याच्या बाटलीचे ४० रुपये मागितले, त्यावर प्रवशाने त्याचे बिल मागितले असता दुसरा कर्मचारी येऊन चक्क बिल देण्यास नकार देत आहे.’ हा व्हिडिओ ट्विट केला असता तो व्हायरल झाला आणि मध्य रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कँटीन ठेकेदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली आहे.
दरम्यान मध्य रेल्वेकडून अधिकृत ट्विटर हॅन्डल व इतर समाजमाध्यामातून आवाहन करण्यात आले आहे की, ‘सर्व स्टॉल्स आणि पॅन्ट्री कार्सना फक्त १५ रूपये दराने एक लिटरच्या रेल नीर पाण्याच्या बाटल्या विकण्याची मंजुरी देण्यात आली आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावर जादा शुल्क आकारले जात असल्यास रेल्वे स्थानकावर किंवा ऑनलाइन तक्रार करता येईल.
Join Our WhatsApp Community