देवनार डम्पिंगवरील कचऱ्यातून ‘पोकलेन’ असेही कमवतात पैसे

140

देवनार भराव भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्याचे प्रमाण बंद करण्यात आले असून केवळ डेब्रीजचा भरावच या भूमीवर टाकला जात आहे. परंतु या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा बाजूला करून कचरा वाहक वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी पोकलेन मशीनची सेवा घेत त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते, त्याठिकाणी आजही कचरा टाकण्याचे प्रमाण बंद झाल्यानंतर ही सेवा सुरु ठेवण्यात आली असून कचरा असताना दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा दीड हजार रुपये प्रती पाळी अधिक पैसे मोजले जात आहेत. त्यामुळे देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील पोकलेन मशीनची सेवा देण्याच्या नावाखाली आजही कंत्राटदारांचे खिसे भरले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

( हेही वाचा : राज्यातील ‘या’ चार परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान )

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु असून लवकरच या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे एकेकाळी सर्वाधिक कचऱ्याची विल्हेवाट लावल्या जाणाऱ्या या डम्पिंग ग्राऊंडवर सध्या दररोज ५०० ते ७०० मेट्रीक टन डेब्रीजचा राडारोडा तेवढाच टाकला जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे यापूर्वीपासून याठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार झाल्याने याचा कचरा वाहतूक रस्त्यावर पसरला जात असल्याने तो कचरा बाजू करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पोकलेन मशीनची सेवा घेतली जात होती. ती सेवा आजही प्रशासकीय मान्यतेनु सुरु ठेवली आहे.

पोकलेन मशिनचा वापर करून कच-याच्या उंच ढिगा-यांचे स्थानांतरण, कचरा सपाटीकरण व उंचावर स्थानांतरीत करण्यासाठी हे कंत्राट पुढेही चालू ठेवले आहे. या कामांसाठी पुन्हा एकदा मेसर्स अंशुमन अँड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति पाळी १२ हजार ८२८ रुपये दराने १२ पोकलेन मशीनची सेवा ४०० दिवसांकरता किंवा ४३८० पाळ्यांकरता एकूण ५ कोटी ८४ लाख ३४ हजार १८८ रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून ही एकमेव कंपनी पोकलेन मशीनची सेवा देण्याचे काम करत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत अनेकदा समाजवादी पक्षाचे तत्कालिन गटनेते रईस शेख यांनी या कंपनीकडून पोकलेन मशीन चालवल्या जात नसून केवळ जुन्या पोकलेन मशीन दाखवून काम केल्याचे पैसे घेतात,असा आरोप केला होता. जेवढ्या मशीन भाडेतत्वावर घेतल्याचे दाखवले जात आहे, तेवढ्या मशीनही डम्पिंग ग्राऊंडवर नसल्याचाही आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. त्यातच सध्या कचऱ्याची उलथापालथ करण्याचे काम कमी असताना मागील वेळेला प्रति पाळी ११ हजार १९१ रुपये एवढा दर असताना आता १२ हजार ८२८ एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी दिलेले कंत्राट २९ ऑक्टोबर २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ४०० दिवसांकरता हे कंत्राट वाढवून देताना त्याच कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे मागील सात ते आठ वर्षांपासून याठिकाणी अंशुमन अँड कंपनी एकमेव कंपनीच पोकलेन मशीनची सेवा देत आहे. त्यामुळे आतमध्ये नक्की किती पोकलेन मशीन्स आहेत आणि किती कालबाह्य झाले याची कोणतीही माहिती घनकचरा व्यवस्थापनाकडे नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यातून पैसा शोधतोय कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे स्वीकारण्यात येणाऱ्या कचरा व कव्हरिंग मटेरियल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याठिकाणी नवीन लूप बनविताना कचरा व हार्डमटेरियल स्थानांतरण करणे, क्षेपणभूमीतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यातील गाळ काढून ते विविध लूप मध्ये हलविणे, तसेच मुख्य रस्त्यावर कचरा वाहनांमधून आणलेला कचरा व तसेच रोड स्क्रॅपिंग नंतर जमा झालेले मटेरियल लूप मध्ये स्थानांतरण करणे, इत्यादी कामांकरता मोठया क्षमतेच्या पोकलेन मशिन्स वापरात घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.