रस्ते आणि नालेसफाईचे कंत्राटदार वळतात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांकडे

164

मुंबई महापालिकेच्या रस्ते आणि नालेसफाईच्या कामांमधील घोटाळ्यांमुळे अनेक कंत्राटदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यापूर्वी महापालिकेत रस्ते आणि नालेसफाईच्या कामे करणाऱ्या कंत्राट कंपन्या आता जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांकडे वळू लागल्या असल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : देवनार डम्पिंगवरील कचऱ्यातून ‘पोकलेन’ असेही कमवतात पैसे)

मुंबई महापालिकेच्यावतीने पश्चिम उपनगरातील कांदिवली अर्थात आर दक्षिण विभागातील पाणी गळती थांबवण्यासाठी तसेच गळक्या जलवाहिनीमुळे दुषित पाणी पुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये न्यू इंडिया रोडवेज ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीला सव्वा नऊ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. या निविदेमध्ये एम.बी.ब्रदर्स आणि आर.एस. कस्ट्रक्शन या कंपनीने सहभाग दर्शवला होता. पात्र ठरलेली न्यू इंडिया रोडवेज ही कंपनी यापूर्वी रस्ता आणि नालेसफाईची कामे मिळवत होती, परंतु मागील काही वर्षांमध्ये या दोन्ही प्रकारच्या कामांमध्ये घोटाळे समोर आल्यानंतर तसेच याप्रकरणी अनेकांना काळ्या यादीत टाकल्यामुळे कंत्राट कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अनेकांनी रस्ते आणि नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवली असून याप्रमाणेच न्यू इंडिया रोडवेज ही कंपनीही जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांकडे वळल्याचे पहायला मिळत आहे.

कांदिवली परिसरातील २४ ऑगस्ट २०२० पासून ३० जून २०२२ पर्यंत विद्यमान जलवाहिन्यांपासून होणाऱ्या ६२८ गळत्या दूर करण्यात आल्या आल्याचा दावा जलअभियंता विभागाने केला आहे. तसेच सिमेंट काँक्रीटीकरणामुळे तसेच पर्जन्य जलवाहिन्यांपासून जाणाऱ्या ४० जलवाहिनी बदलण्यात आल्या तसेच ४ जुन्या व गंजलेल्या जलवाहिनी बदलण्यात आल्याचीही माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे. यापूर्वी नेमण्यात आलेल्या कंत्राटाचा कालावधी ऑगस्ट २०२२मध्ये संपुष्टात आल्यानंतर आता पुढील कामांसाठी महापालिकेने या नवीन कंत्राटदाराची निवड केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.