हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचसा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटांवरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून अनेक ठिकाणी हर हर महादेव या सिनेमाचे शो बंद ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर आता संभाजीराजे यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
संभाजीराजेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चित्रपटांची अशा पद्धतीने मोडतोड होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपल्याला हवा तसा इतिहास वळवता येत नाही. इतिहासाचा गाभा सोडून कसे काय जाऊ शकतात?, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.
(हेही वाचाः ‘इतिहासाची मोडतोड कराल तर गाठ माझ्याशी आहे’, संभाजीराजे छत्रपती यांचा थेट इशारा)
चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला तयार आहे. पण इतिहासाची मोडतोड केली तर गाठ माझ्याशी आहे, असा थेट इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी होत आहे.
Join Our WhatsApp Community