राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्तार यांच्यावर टीका करण्यात येत असून राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. याचबाबत भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अस्मितेबाबत सिलेक्टिव्हपणा नको
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण आदर सन्मान हा प्रत्येक महिलाचा व्हायला हवा. पण महाराष्ट्रात हा असला सिलेक्टिव्हपणा नको. एखाद्या पक्षाच्या महिला नेत्याला बोलल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांची अस्मिता दुखावली जात असेल, तर मग महाविकास आघाडी सरकारने काय केलं?
(हेही वाचाः ‘सत्तारांच्या विधानाचे समर्थन नाहीच, पण…’ फडणवीसांनी केले स्पष्ट)
त्यावेळी अभिनेत्री कंगना रणौत हिच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल का नाही करण्यात आला, असा थेट सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच स्वप्नाली पाटकर आणि केतकी चितळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने झाली तेव्हा संबंधितांवर कारवाई का नाही झाली, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
एकमेकांचा आदर करणे गरजेचे
महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच सगळ्यांनीच भान ठेवायला हवं. महिलांनी सुद्धा बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. मी महिला आहे म्हणून वाट्टेल ते बोलेन आणि त्याला उत्तर आल्यानंतर जर महिलांचा अपमान होत असेल तर हे चुकीचे आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा आदर सन्मान केला पाहिजे. शेवटी उत्तराला प्रत्युत्तर हे असतं, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः ‘…तर मी आजपासून छोटा पप्पू’, सत्तारांच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community