योग विद्या निकेतन या संस्थेच्या सदस्या मंजिरी फडणीस यांनी लिहिलेल्या ‘यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली-बालसंस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत 14 नोव्हेंबर 2022 ला (बालदिन) वयम् मासिकाच्या संपादक शुभदा चौकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
योग विद्या निकेतन या संस्थेच्या माध्यमातून 1995 पासून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. 5 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी हे बालसंस्कार शिबिर असते. परंतु कोरोना महामारीमुळे दामले योग केंद्र, माटुंगा येथे होणारी शिबिरे सलग तीन वर्षे होऊ शकली नाहीत. त्यामुळे मागच्या 15 वर्षांपासून या शिबिरात शिकवणा-या मंजिरी फडणीस यांना अस्वस्थ वाटत होते. यामुळे त्यांना पुस्तक लिहावेसे वाटले. यातूनच ‘यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली – बालसंस्कार’ हे पुस्तक आकाराला आले.
हे पुस्तक लिहिल्यानंतर मंजिरी फडणीस यांनी 5 जून 2021 रोजी योग भवन, वाशी येथे योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांना हे पुस्तक दाखवले. त्यावेळी त्यांनी आनंदी होऊन, यशस्वी भव: असा आशिर्वाद दिला, अशी आठवण फडणीस यांनी सांगितली.
…म्हणून लिहिले पुस्तक
2007 पासून दामले योग केंद्र येथे होणा-या बालसंस्कार शिबिरात मंजिरी फडणीस या लहान मुलांना शिकवतात. परंतु कोरोनामुळे मागच्या तीन वर्षांपासून बालसंस्कार शिबिर न झाल्याने मुलांच्या संस्कारात, योग शिक्षणात व त्यामुळे होणा-या त्यांच्या सर्वांगीण विकासात खंड पडला होता. पण असे पुन्हा होऊ नये यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
हे पुस्तक लिहिण्यामागे मंजिरी फडणीस यांनी योग विद्या निकेतनच्या गुरुवर्यांचे आशिर्वाद लाभल्याचे सांगितले. मुकुंद बेडेकर, सुधाताई करंबेळकर, प्रदीप घोलकर, कृष्णमूर्ती, सरोज आठवले, उमा परुळेकर, अनिता कुलकर्णी व जागृती शहा हे सर्व तज्ज्ञ योगशिक्षक बालसंस्कार शिबिरांचे आयोजन उत्तम व्हावे, यासाठी झटत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, या पुस्तकाच्या निर्मीतीमध्ये श्रीधर परब, उज्ज्वला करंबेळकर, जया तावडे यांनी वेळ देऊन हे पुस्तक सर्वांगाने उत्तम व आकर्षक व्हावे म्हणून उत्स्फूर्तपणे मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या रियाचे घवघवीत यश,कांस्य पदकाची कमाई )
पुस्तकातील चित्रे स्वत: काढली
या पुस्तकातील सर्व चित्र मंजिरी फडणीस व त्यांच्या योगसाधक शताक्षी ऊरणकर यांनी काढली आहेत. या पुस्तकाच्या लेखनासाठी कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याबाबतही त्यांनी आभार व्यक्त केले. या पुस्तकामुळे छोटी मुले- मुली व त्यांचे पालक यांच्या चेह-यावर कायम आनंद व समाधान झळकत राहील, अशी आशा मंजिरी फडणीस यांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community