पुणे महापालिकेने अलिकडेच ४४८ पदांच्या भरतीची घोषणा केली होती. यानंतर आता पालिकेमार्फत आणखी २०० पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभाग, अग्निशामक दल व इतर विभागातील वरिष्ठ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
( हेही वाचा : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंधेरीतील फेरीवाल्यांना हटवा; मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश )
कामाचा ताण वाढल्याने अतिरिक्त भरणार
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेत २०१४ पासून भरती झालेली नव्हती, आकृतिबंध तयार झाल्यानंतर भरती प्रक्रिया केली जाणार होती, वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने २०१५ मध्ये नव्या भरतीला बंदी घातली. त्यामुळे महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी कंत्राटी कामगारांची संख्या वाढवावी लागली. पण महत्त्वाच्या पदांवरील कर्मचारी, अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने प्रशासकीय कामाचा ताण वाढू लागला.
दरम्यान कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा भरती करण्यावर निर्बंध आणले गेले. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर गेल्यावर्षी राज्य शासनाने भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठवले. त्यानंतर सर्व विभागांचा आढावा घेऊन कनिष्ठ अभियंता, लिपिक, अतिक्रमण सहाय्यक निरीक्षक, सहाय्यक विधी सल्लागार या पदांवरील ४४८ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. ऑनलाइन परीक्षेनंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर कनिष्ठ अभियंता पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
Join Our WhatsApp Community