दहिसर ते भाईंदर मेट्रो -९ मार्गाचा उत्तनपर्यंत विस्तार करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रस्तावाधीन आहे. मात्र, कारशेडसाठी जमीन मिळत नसल्यामुळेच हे अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : १८ हजार पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल! )
मेट्रो ९ मार्गासाठी सुरुवातीला राई मुर्धा गावात कारशेडची आखणी करण्यात आली. त्यासाठी ३२ हेक्टर जमीन आवश्यक होती. या परिसरात प्रामुख्याने शेती होते. शेतजमिनी असल्यामुळे जमिनी दिल्यास उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल उपस्थित करीत स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. या विरोधाची धार पाहता एमएमआरडीएने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली. मात्र, जवळच्या टप्प्यात इतकी मोठी जमीन उपलब्ध नसल्यामुळेच मेट्रो ९चा ‘उत्तन’पर्यंत विस्तार करण्याची योजना पुढे आली आहे.
सुरुवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ९ मार्गाचे शेवटचे स्थानक भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र चौकात प्रस्तावित होते. आता या स्थानकापासून पुढे उत्तनच्या खोपरा गावापर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. हा विस्तार व्यवहार्य ठरेल का याचा अभ्यास केला जाणर असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती देण्यात आली.
जमीन कोणाच्या मालकीची?
उत्तनच्या खोपरा गावात महसूल विभागाची जमीन आहे. त्यातील काही जमीन कारशेडसाठी वापरता येऊ शकते. उर्वरित जमिनीचा विकास करून एमएमआरडीएला महसूल मिळू शकतो. उत्तन परिसरात विपश्यना केंद्रही आहे. त्यामुळे उत्तनपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार झाल्यास या भागात पर्यटनाला आणखी चालना मिळेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community