खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करीत रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांचे बंधू तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या विषयावर मौन बाळगल्यामुळे ते नाराज आहेत का, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी अजित पवार यांनी व्यासपीठ सोडले होते. त्यावेळीही त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे नुकत्यात शिर्डीत झालेल्या मंथन शिबिरापासून अजित पवार काहीसे लांब असल्याचे पहायला मिळाले. पहिल्या दिवशी त्यांनी शिबिराला हजेरी लावली खरी, पण सायंकाळी ते निघून गेले ते पुन्हा परतलेच नाहीत. आयसीयुमध्ये असलेले शरद पवार या शिबिराला आले असताना, अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
ट्वीटरवरही प्रतिक्रिया नाही
भगिनी सुप्रिया सुळेंविरोधात एका मंत्र्याने अपशब्द वापरल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असताना, अजित पवारांनी साधी ट्वीटरवरूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अजित दादांचे मौन वेगळ्या वाटेची चाहूल तर नाही ना, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.