मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत केलेल्या उठावानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट राज्यात स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका करण्यात आघाडीवर असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आता मोठी घोषणा केली आहे. सय्यद या शिंदे गटात सामील होणार असून पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी सय्यद मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. सय्यद यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
लवकरच पक्षप्रवेश करणार
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहे. हा पक्ष प्रवेश तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी आपण आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारायला तयार आहे, असेही सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.
राऊतांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळतेय
संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्या विधानामुळेच पक्ष फुटून आज दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनीच मला शिवसेनेत आणलं होतं त्यामुळे त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे, असेही सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.
अंधारे,गो-हे चिल्लर आहेत
मुंबई महापालिकेतले खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरे यांना भासत आहे. नीलम गो-हे,सुषमा अंधारे या सगळ्या चिल्लर आहेत. त्यांच्यामागचा खरा सूत्रधार या रश्मी ठाकरे आहेत, असा आरोपही सय्यद यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community