नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नाशिक येथील ४० वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवे हृदय मिळाले. रुग्णाचे फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत तसेच हृदयही खराब झाले होते. मात्र एका रुग्णाने मृत्यू पश्चात हृदय दान करताच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून काही तासांतच नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात नव्या हृदयासाठी थांबलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया झाली. तब्बल पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गरजू रुग्णाला नवे हृदय मिळाले. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांचे इतर अवयवही व्यवस्थित कार्य करु लागले, त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा दिसून येत असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य हृदय शल्यचिकित्सक – हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. संजीव जाधव यांनी दिली.
रुग्ण दगावण्याची भीती होती
४० वर्षांचे नवनाथ जर्हाड हे मूळचे नाशिकचे रहिवासी. त्यांना इस्केमिक कॅमोथेरपीमुळे हृदयविकाराचा त्रास झाला होता. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची एंजिओप्लास्टीही झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांची अचानक तब्येत खालावली. हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तब्येत खालावल्याने त्यांना १०० मीटर चालताही येईना. रात्रीही त्यांना व्यवस्थित झोप लागत नव्हती. त्यामुळे त्यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची नितांत आवश्यकता होती. डॉ. संजीव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला श्वसनाचा त्रास होत होता. चेह-यावर आणि पायावर सूज आली होती. पोटात आणि फुफ्फुसात पाणी साचल्याने रुग्ण दगावण्याची भीती होती. अशातच एका तरुण दात्याकडून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या नवनाथ यांना हृदय मिळताच तातडीने आम्ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. मात्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
(हेही वाचा अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी?)
Join Our WhatsApp Community