नवी मुंबईत लहान मुलांना होतोय ‘हा’ दुर्मिळ संसर्गजन्य रोग

151

श्वसनाचा तीव्र त्रास होत शरीरातील ऑक्सिजन मात्रा निकामी करणा-या बोकाव्हायरस नवी मुंबईत लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. हा एक दुर्मिळ संसर्गजन्य आजार असून, वेळेत निदान न केल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होते, प्रसंगी रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दोन वर्षांच्या मुलावर उपचार सुरु असताना बोकाव्हायरसचे निदान झाले. हा रुग्ण आता बरा झाल्याची माहिती रुग्णालयाकडून दिली गेली. या आजाराचे विषाणू हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जास्त प्रभावी ठरत असल्याने डॉक्टरांनी प्रादूर्भावाची शक्यता काही प्रमाणात वाढू शकते, असा इशारा दिला आहे.

दोन वर्षांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या पालकांनी बाळाला खासगी रुग्णालयात दाखल केले. बाळाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ८५ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने बाळाला तातडीने उपचारास सुरुवात करण्यात आली. तपासाअंती बाळ बोकाव्हायरस बाधित असल्याचे निदान झाले. बाळाला बोकाव्हायरच्या पहिल्या प्रकाराची बाधा झाली होती.

(हेही वाचा अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी?)

बोकाव्हायरस म्हणजे काय?

बोकाव्हायरस हा दुर्मिळ संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा विषाणू तीन वर्षांखालील लहान मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर एन्फ्लूएन्झा विषाणूंसारखीच आहेत. रुग्णाला सर्दी, खोकला तसेच इतर श्वसनमार्गाचे संक्रमण होते. परिणामी हा व्हायरस ओळखणे कठीण होऊन बसते. बोकाव्हायरचे पहिला, दुसरा आणि चौथा असे प्रमुख प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारात श्वसनमार्गाचा संसर्ग दिसून येतो. दुस-या आणि चौथ्या प्रकारात ओटीपोटात दुखणे तसेच पोटाशी संबंधित इतर संसर्ग आढळून येतात.

कसे होते निदान? 

बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकातील द्रव, रक्त तसेच शौचाचे नमुने पीसीआर चाचणीद्वारे तपासल्यास या आजाराचे निदान होते. श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल तरच मुलांची पीसीआर चाचणी केली जाते. या विषाणूचा प्रभाव १.५ ते १९.३ टक्क्यांपर्यंत आढळून येतो.

कसे होते उपचारपद्धती?

बोकाव्हायरस संसर्गावर कोणतेही विशिष्ट औषध तसेच उपचारपद्धती उपलब्ध नाही. सहाय्यक उपचारपद्धतींच्या माध्यमातूनच उपचार दिले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.