फ्लेमिंगो पर्यटनाला आता जलमार्गाची जोड; बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईट सेवा लवकरच

166

नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील जलवाहतूक प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे लवकरच बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईट सिंग आणि बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे मार्ग कार्यान्वित केले जातील, अशी माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी दिली.

मुंबईतील जलवाहतुकीसंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. या वेळी बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा उपस्थित होते.

भुसे म्हणाले, मुंबई परिसराला लाभलेला समुद्र किनारा प्रवासी जल वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. मुंबई परिसरात राबविण्यात येणाऱ्या या विविध प्रकल्पांमुळे प्रवासी जल वाहतुकीत मोठी क्रांती होणार आहे. राष्ट्रीय जल वाहतूक मार्गाअंतर्गतचे, तसेच मुंबई व परिसरातील प्रवासी जल वाहतूकीचे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पर्यावरण व वन विभागाच्या सर्व अत्यावश्यक परवानग्या घेऊन हे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

अत्याधुनिक पद्धतीने बंदरांचा विकास

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने जेट्टींच्या पायाभूत सुविधांचा विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा, सर्व दृष्टीने सुरक्षित अशा अत्याधुनिक बोटी, इलेक्ट्रॉनिक व सोलर बोटी यांचा समावेश तसेच बोटींची दुरुस्ती व नव्या बोटी तयार करणे यासाठी शीपयार्डची बांधणी यावर भर देण्यात येणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले. बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या नवीन प्रवासी जल वाहतूक मार्गावरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासी जल वाहतूकीचे १३ मार्ग आहेत. अन्य प्रस्तावित मार्गांमध्ये सागरमाला प्रकल्पांतर्गत वसई ते भाईंदर, वसई खाडीतून जाणारा कल्याण ते भाईंदर, रेडिओ क्लब ते मिठी बंदर, बेलापूर ते मिठी बंदर, मनोरी ते मार्वे, करंजा ते रेवस, गोराई ते बोरीवली या मार्गांचा समावेश आहे. डीसीटी ते मांडवा व बेलापूर ते एलिफंटा या प्रवासी जल वाहतूक मार्गावर वॉटर टॅक्सी आहेत. तर बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईट सिंग व बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे मार्ग देखील लवकरच कार्यान्वित होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.