महाराष्ट्र जर कुणापासून वंचित राहत असेल तर ते संजय राऊत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांची कमतरता नक्कीच जाणवते. कारण सकाळ सकाळ त्यांचा चेहरा पाहण्याची सबंध महाराष्ट्राला सवय झाली. आपल्याकडे प्रभाते मनी राम चिंतीत जावा असं म्हणतात. सकाळी सकाळी देवाचं नाव घ्यायचं, म्हणजे आपला दिवस चांगला जातो. पण संजय राऊतांनी महाराष्ट्राची दैदिप्यमान परंपरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सकाळी सकाळी शिव्या देण्याची नवीन परंपरा सुरु केली. अतिशय शिवराळ, गलिच्छ किंवा राऊतांच्या भाषेत सांगायचं तर नॉटी भाषेत संजय राऊत बोलायचे आणि महाराष्ट्राची सकाळ अतिशय वाईट जायची. त्यामुळे आपला दिवस देखील वाईट आणि शिवराळ झाला जायचा.
( हेही वाचा : फेरीवाल्यांना नकोय पंतप्रधानांचा स्वनिधी, हवी बसण्याची निश्चित जागा! )
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना अतिशय गलिच्छ परंतु राऊतांच्या संस्कृतीला शोभणारी शिवी दिली. अशा शिव्या इथे लाजेखातर लिहिता येत नाहीत. परंतु त्या राऊतांनी मीडियासमोर दिल्या होत्या आता अब्दुल सत्तार संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. अब्दुल सत्तार यांची भाषा चुकीचीच आहे हे कुणीही सुजाण माणूस सांगेल. तशी संजय राऊतांची भाषा चुकीची होती. महाविकास आघाडीने जर कोणती चूक केली असेल, तर ती चूक म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी विरोधकांना डिवचलं, आपल्या विरोधकांना वाह्यात कारणावरुन तुरुंगात डांबण्याचं, मारहाण करण्याचं काम केलं व सतत त्यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. माझ्या दृष्टीने ही त्यांची सर्वात मोठी चूक होती.
तुमचं सरकार आलं आहे तर तुम्ही गप्प कामे केली पाहिजेत. विरोधक आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करणार. पण त्यांच्या गळाला आपण लागता कामा नये, ही भूमिका त्यांनी घेतली नाही. तिच चूक आता शिंदे गटाचे लोक करत आहेत. अब्दुल सत्तार जे बोलले त्यावरुन आता मोठं आंदोलन उभं राहिलं आहे.
अशा परिस्थिती आपण काय बोलतोय याचं भान सत्ताधार्यांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना काय बोलावं आणि काय बोलू नये यासंबंधी मार्गदर्शन केलं पाहिजे. अब्दुल सत्तार किंवा इतर आमदार संजय राऊतांची भाषा बोलू लागले की त्यांची अवस्था देखील संजय राऊतांसारखी होईल. त्यामुळे अखंड सावधान असावे.
Join Our WhatsApp Community