गोवरमुळे मुंबईत 48 तासांत 3 मुलांचा मृत्यू, केंद्र सरकारने घेतली दखल! अशी आहेत लक्षणे

128

गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळ देशात असलेले कोरोनाचे संकट आता निवळत असताना, देशात आणखी एका आजाराने डोके वर काढले आहे. देशात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराने केवळ 48 तासांत तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही तिन्ही मुले एकाच घरातील असून यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. गोवरवर कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याने या आजाराची लक्षणं जाणून घेणं गरजेचं आहे, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

आजाराबाबत सतर्क राहण्याचा सल्ला

मुंबईतील गोवंडी येथे गोवरमुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्यानं या आजाराबाबत सतर्क राहण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन एक विशेष पथक मुंबईला पाठवले आहे. दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि पुण्याच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. डॉ.अनुभव श्रीवास्तव या पथकाचे नेतृत्व करत आहेत.

(हेही वाचाः मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, पोलिसांनी जारी केले आदेश)

TOI च्या एका अहवालानुसार,50 मुलांपैकी 29 संक्रमित मुलांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आली होती. शहरातील गोवरच्या या वाढत्या प्रसाराबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीसोबत आपण संशोधन करत असल्याचे मुंबई महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले.

अशी आहेत गोवरची लक्षणे

  • लहान मुलांना गोवरचा धोका हा सर्वाधिक संभवतो. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे गोवर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येताच 7 ते 14 दिवसांत या आजाराची प्रमुख लक्षणे दिसून येतात.
  • 104 डिग्रीपर्यंत ताप,खोकला,नाक गळमे,डोळे लाल होणे आणि डोळ्यातून पाणी येणे, ही गोवरची प्रमुख लक्षणे आहेत.
  • संक्रमित लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसून आल्यानंतर 2 ते 3 दिवसांत तोंडात पांढरे डाग दिसतात. तसेच अंगावर लाल रंगाच्या खूणा देखील दिसू लागतात.
  • गोवरवर कोणताही ठोस औषधोपचार सध्यातरी उपलब्ध नसल्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.
  • गोवर संक्रमित मुलांची काळजी घेणे तसेच इतर मुलांना त्याची बाधा होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.