मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन बंदी असणार आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य दहशतवादी कारवायांचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबई परिसरात ड्रोन बंदीचे आदेश पोलीस आयुक्त मुख्यालयातून जारी करण्यात आले आहे.
काय आहे मुंबई पोलिसांचा आदेश
मुंबईत १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर इत्यादी उड्डाण क्षमता असलेल्या संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश ७ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला असून तो या वर्षी १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस दलाने सांगितले.
(हेही वाचा – PUC नसेल तर विम्याच्या क्लेमला सुद्धा मुकावं लागेल! काय आहे नियम?)
पोलिसांच्या आदेशानुसार, असामाजिक घटक, दहशतवादी ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत कायदा व सुव्यस्था बिघडवू शकतात. अशा घटकांच्या कारवायांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाय आवश्यक असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्याचे आदेश म्हटले आहे. पुढील ३० दिवसांसाठी म्हणजेच १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीसाठी ही बंदी राहणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून हवाई पाळतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन या पोलिसांच्या आदेशाकरता अपवाद असल्याचेही सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community