…तर अमोल कीर्तिकरही शिंदे गटात दिसले असते

129
बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्यांचे सुपुत्र आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक संभ्रमात असून, पिता-पुत्र एकाच घरात राहून दोन वेगवेगळ्या पक्षांचे काम कसे करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, कीर्तिकर पुत्र अमोल हेही शिंदे गटात प्रवेश करणार होते; पण त्यांना अपेक्षित असलेल्या जागेचे गणित न जुळल्याने त्यांनी निर्णय बदलल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना कांदिवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळेस भाजपच्या अतुल भातखळकर यांनी त्यांना मोठ्या मत फरकाने पराभूत केले. त्यानंतरच्या काळात त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करीत कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्यामुळे २०१९ ला तिकीट मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. पण, ही निवडणूक शिवसेनेने भाजपासोबत युतीमध्ये लढवल्याने पुन्हा भातखळकर यांनाच संधी मिळाली. त्यामुळे कीर्तिकर काहीसे नाराजही झाले होते. मात्र त्यांनी अपक्ष लढण्याचे धाडस केले नाही.
एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर रामदास कदम यांच्यासह गजानन कीर्तिकर यांनाही आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. कीर्तिकर यांनी तयारी दर्शवली, पण पुत्र अमोल यांनी त्यांना रोखले. कांदिवली मतदारसंघाचा शब्द देत असलीत, तरच आपण शिंदे गटात जाऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे गजाभाऊंनीही एक पाऊल मागे घेतले. पण, एकामागोमाग एक नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडू लागल्याने अखेर त्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
अमोल कीर्तिकर यांना २०२४ च्या निवडणुकीत कांदिवली ऐवजी दिंडोशी मतदारसंघातून तिकीट देण्याची तयारी शिंदे गटाने दर्शवली. परंतु, विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्यासमोर लढणे अधिक आव्हानात्मक असल्याने अमोल यांनी कंदिवलीचा हट्ट कायम ठेवला. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर त्यांना देण्यात आली. परंतु, त्यास त्यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने शिंदे गटाने पुढची चर्चा थांबवली. ही चर्चेची फेरी सकारात्मक रित्या पार पडली असती, तर अमोल कीर्तिकरही बाळासाहेबांच्या शिवसेनेत दिसले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.