मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करीत, त्याजागी नवीन समिती नेमण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण; नव्या समीकरणांची नांदी?)
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीही किनार होती. या समितीच्या माध्यमातून निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्याचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेचा मानस होता. परंतु, सत्ताबदल झाला आणि त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्याकरिता मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे असतील. औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करेल. तसेच यासाठी येणारा सुधारित खर्चाचा आराखडाही सादर केला जाईल.
महाविकास आघाडीने नेमलेले समिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवासाठी ७५ कोटींची तरतूद केली. महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री अशोक चव्हाण, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख आणि धनंजय मुंडे या मंत्र्यांची उपसमिती स्थापन केल्याचा शासननिर्णय ४ मे २०२२ रोजी जारी करण्यात आला. त्या समितीने अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाची रुपरेषाही तयार केली. मात्र, राज्यात शिंदेसरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्यात आली.