मनसेची ताकद मुंबईतील केवळ आठ विधानसभा क्षेत्रातच!

166

शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर मागील काही महिन्यांपासून शांत बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारपासून लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात मनसेची ताकद ही मुंबईतील ३६ विधानसभा मतदार संघापैंकी केवळ ८ विधानसभा क्षेत्रामध्येच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसेने बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती केल्यास प्रमुख २०मतदार संघांमध्ये मजबूत स्थिती असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

( हेही वाचा : शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही – बावनकुळे )

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पुन्हा एकदा पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे शिवसेनेनंतर आता मनसेनेही येत्या २७ नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा त्याच जागी अर्थात गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये घेतला जाईल अशाप्रकारची घोषणा केली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून मनसेचे पदाधिकारीच विखुरलेले असून विभाग अध्यक्ष असला तरी शाखाध्यक्ष नाही आणि शाखाध्यक्ष असले तरी गटाध्यक्ष नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजही मनसेकडे गटाध्यक्ष हे कागदावरच दिसत असल्याने प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने मनसे नक्की मेळावा कुणाचा घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.याच पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची वांद्रे एमआयजी क्लब येथे सकाळी आठ वाजता लोकसभा मतदार संघनिहाय बैठक घेणार आहे. त्यामुळे आगामी गटाध्यक्षांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असली तरी आगामी निवडणुकीच्यादृष्टीकोनातून ही संघटनात्मक बांधणी मानली जात आहे. सन २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मनसेची संघटनेवरील पकड ढिली होत गेली आहे. ज्यामुळे मनसेची स्थापना झाल्यांनतर ज्याप्रकारे प्रत्येक विभागात मनसेची शाखा आणि कार्यकर्ते यांचे जाळे पसरले होते,ते जाळे आता तेवढ्याप्रमाणात पसरलेले पहायला मिळत नाही. मनसेचे कार्यकर्ते आता विखुरले गेले असून यासर्वांची पुन्हा एक मोट बांधून पक्षाची जीव ओतून काम करण्यास भाग पाडण्यासाठी स्वत: राज ठाकरे यांना मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही.

महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसे ०७ नगरसेवक निवडून आले होते,त्यातील सहा नगरसेवक शिवसेनेत गेले आणि एकमेव संजय तुर्डे हे मनसेत तर त्या आधीच्या म्हणजे २०१२च्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा मुंबईत एकही आमदार निवडून आला नाही.

मात्र, मनसेने बाळासाहेबांची शिवसेना सोबत युती केल्यास आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास भायखळा, शिवडी, वरळी, माहिम़-दादर, चांदिवली, भांडुप, विक्रोळी आणि वांद्रे पूर्व आदी विधानसभा मतदार संघात उमेदवारी निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. यासर्व मतदार संघांमध्ये प्रथम दर्शनी २० महापालिका प्रभागांमध्ये मनसेची ताकद दिसून येत असून प्रथमदर्शनी मनसेला युतीच्या मदतीने किमान २० नगरसेवक निवडून आणता येवू शकतात असे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.