मुंबई: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दरवर्षी १५ ऑगस्टला कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ‘मुंबई अल्ट्रा’च्या वतीने १२ तास मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी संपूर्ण देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट असल्याने मॅरेथॉन घेण्याऐवजी मोठया प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी १५ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिराचा उपक्रम होणार आहे.
कोरोनामुळे रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा
यंदा राज्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला असून, रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये रोज १२०० ते १५०० रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा करावा लागत आहे. हाच रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘मुंबई अल्ट्रा’ने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. मुंबईकरांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन एक जीव वाचवण्यास मदत करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
असे असेल रक्तदान शिबिर
१) शिबिरा दरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे पालन.
२) रक्तदान शिबिरासाठी १२ बेड्स उपलब्ध.
३) रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला मास्क, हात स्वच्छ धुणे बंधनकारक.
४) रक्तदान शिबिरापूर्वी तसेच वेळोवेळी संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला जाणार.
५) रक्तदात्याची तपासणी केल्यानंतरच रक्त घेतले जाणार.