चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतील तरुणांमध्येही आता वयाच्या अठराव्या वर्षापासूनच शरीरात साखरेचे अतिरिक्त प्रमाण आढळून येत आहे. १८ ते ६९ वयोगटातील व्यक्तींच्या शरीरात १८ टक्के साखरेचे अतिरिक्त प्रमाण आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २०२१ साली मुंबईतील मृत्यूदरात १४ टक्के रुग्ण मधुमेहाचे होते. यंदाच्या वर्षात २६ सप्टेंबरपासून माता सुरक्षित, तर घर सुरक्षित या अभियानात पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी १ लाख ३ हजार ४२० महिलांची मधुमेह निदानाची तपासणी केली असता, ७ हजार ४७५ महिलांंना मधुमेहाचे निदान झाले आहे. त्यामुळे मधुमेहापासून वाचण्यासाठी निरोगी जीवनशैली स्विकारा, असे आवाहन मधुमेहतज्ज्ञांनी केले आहे.
(हेही वाचाः ४.९८ टक्के मुंबईकर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या उंबरठ्यावर; दोघांपैकी ‘हा’ आजार जास्त बळावण्याची शक्यता)
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित मधुमेहींना वाचवणे डॉक्टरांसाठी फारच जिकरिचे होऊन बसले होते. दुस-या लाटेदरम्यान घातक विषाणूचा सामना करताना मधुमेहग्रस्तांना मोठ्या प्रमाणात आपला जीव गमवावा लागला होता. या दोन्ही लाटांतील मधुमेहग्रस्तांना गंभीर आजार पटकन होत असून, जीवही गमवावा लागत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. २०२१ साली जागतिक आरोग्य संघटनेने मुंबईमध्येे केलेल्या स्पेप्स सर्व्हेक्षणानुसार, १८ ते ६९ वयोगटातील १८ टक्के माणसांच्या शरीरात उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅमपेक्षाही अधिक आढळले आहे.
(हेही वाचाः 2025 पर्यंत भारतात मधुमेही रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढणार? काय आहे WHO चा रिपोर्ट)
या अहवालानंतर पालिकेने प्रमुख पालिका रुग्णालयांतही असंसर्गजन्य आजार केंद्रांची उभारणी केली. या केंद्रांत ३० वयोगटापुढील संशयित मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाची बाधा होण्याची शक्यता असलेल्या रुग्णांबाबतची निरीक्षणे-
- असंसर्गजन्य आजार केंद्रात आतापर्यंत ३२ हजार ९६ रुग्णांनी तपासणी केली
- १२ टक्के रुग्णांच्या शरीरातील रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा अधिक दिसून आला
- ११ टक्के रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण १४० मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे.
- ५ टक्के लोकांमध्ये रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षाही जास्त नोंदवली गेली