गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी दुपारी अमिर्झा गावात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. या भागांत टी-६ या वाघीणीचा वावर आहे. मात्र टी-६ वाघीणीचा या हल्ल्यात समावेश असल्याबाबत वनाधिका-यांमध्ये दुमत आहे. वाघीणीचा अमिर्झा गावात वावर असला तरीही घटनास्थळाजवळ वनविभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टी-६चा वावर दिसून आला नाही. या वाघीणीला गेल्या दीड महिन्यांपासून जेरबंद करण्यासाठी वनाधिका-यांची टीम प्रयत्नशील आहे.
सहा जणांचा बळी
यंदा गडचिरोली जिल्ह्यात सिटी-१ तसेच टी-६ या वाघांमुळे माणसांवर हल्ले झाल्याच्या घटनांत वाढ दिसून आली. सिटी-१ या नर वाघाला १३ ऑक्टोबर रोजी वनाधिका-यांनी जेरबंद केले. त्याचवेळी टी-६ वाघीणीचाही शोध सुरू होता. मात्र टी-६ वाघीण अद्यापही वनाधिका-यांना सापडलेली नाही. आतापर्यंत या वाघीणीच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला आहे.
(हेही वाचाः मुंबईतल्या ‘या’ दोन्ही वाघीणींची आई बनण्याची संधी हुकली)
या हल्ल्यात वाघीणीचा समावेश?
अमिर्झा येथील मंदा खोटे (३८) या महिलेवर शेतात धान्य कापणीच्या वेळी शनिवारी वाघाचा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. टी-६ या वाघीणीने मंदा खोटे या महिलेवर हल्ला केला आहे, हे खात्रीलायक सांगता येणार नाही. या परिसरात तिचा वावर आहे. तिला ऑक्टोबर महिन्यापासून जेरंबद करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती गडचिरोली वनविभागाचे (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community