राजकारणाचे हिंदूकरण…

188

भारतामध्ये अनेक वर्षांपासून दुर्दैवी गोष्ट घडत होती, ती म्हणजे इथला बहुसंख्य हिंदू असूनही त्याला गृहित धरले गेले, किंबहुना हिंदू हा कुंभकर्णासारखा निद्रिस्त होता की हिंदू समाज म्हणून आपले अस्तित्व असावे असे त्याला यापूर्वी वाटले नाही. त्यामुळे हिंदू समाज राजकीयदृष्ट्या जवळजवळ ६० – ७० वर्षे मागास राहिला. त्यात वाईट गोष्ट अशी की हिंदुंच्या हिंदू म्हणून मागण्या नव्हत्या.

हिंदू-मुस्लिम ऐक्यात काँग्रेसचा वेळ खर्च

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंनी सार्वजनिकरित्या मोदींकडे अशी कोणतीच मागणी केली नाही. पेट्रोलचे भाव, महागाई या गोष्टीत हिंदू समाज अजूनही अडकून पडला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवलेच पाहिजे, त्याचबरोबर विकास झालाच पाहिजे. परंतु हिंदू समाज म्हणून आपल्या स्वतंत्र मागण्या हव्यात. स्वातंत्र्यवीर सावरकर या बाबतीत हिंदूंना जागृत करत होते. कॉंग्रेसला स्वातंत्र्यप्राप्तीपेक्षा हिंदू-मुस्लिम ऐक्य हवे होते. या कार्यक्रमात कॉंग्रेसने बराच वेळ खर्च केला.

अहिंसेमुळे हिंदुंचे नुकसान

त्याऐवजी सावरकर पूर्वास्पृश्यता निवारण हा कार्यक्रम राबवत होते, जेणेकरुन हिंदू समाज एकत्र येऊ शकला. हिंदू-मुस्लिम ऐक्य सावरकरांना देखील हवे होते. परंतु यासाठी हिंदूंनी पराकोटीचा त्याग करावा; या गोष्टीला सावरकरांचा विरोध होता. तत्कालीन हिंदू हा पराकोटीच्या अहिंसेच्या आहारी गेला होता. त्यामुळे हिंदू समाजाचे पुष्कळ नुकसान झाले. वीर सावरकरांना हिंदूला या अहिंसेच्या राक्षसी समुद्रात बुडण्यापासून वाचवायचे होते.

हिंदुस्थान मानाने उभा असण्याला कोणती हरकत?

तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी राजकारणाचे हिंदूकरण झाले पाहिजे असे आवाहन केले. हिंदूंकडे राजकीय सत्ता तर असलीच पाहिजे, त्याचबरोबर हिंदू मतदार जागृत झाले पाहिजेत. हिंदू हिताचा विचार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आपला इतिहास सत्य व आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल अशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे. भारतीय शाळा – कॉलेजमध्ये हिंदू हिताचा पाठ्यक्रम असला पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर अनेक मुस्लिम व ख्रिस्ती राष्ट्रे आहेत. त्यात हिंदुस्थान मानाने उभा असण्याला कोणती हरकत आहे?

हिंदुंच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न

आज ही परिस्थिती काही अंशी बदलली आहे असे दिसून येते. डाव्या विचारसणीकडून हिंदूराष्ट्राची भीती वारंवार घातली जात आहे. खरे सांगायचे तर पाश्चात्य आणि इतर राष्ट्रे हिंदुस्थानाला इंडिया म्हणत असले तरी त्यांना हिंदुस्थानच अपेक्षित आहे. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून लोक इंडियाकडे पाहताना हिंदुंचा देश याच दृष्टीकोनातून पाहतात. अगदी शेजारचा पाकिस्तान देखील आपल्याला हिंदुस्थान म्हणतो. हे सत्य आपल्यापासून लपवले गेले. जणू हिंदुस्थान हा शब्द उच्चारणे हे पाप मानले जाऊ लागले. हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल न्यूनगंड निर्माण करण्यात आला.

मोदींचे हिंदुत्व समाजाला जागृत करणारे

सावरकर मात्र हिंदू हिताबद्दल बोलत होते. आज सावरकर विजयी ठरले आहेत. हिंदू जागृत होतोय. आता हळूहळू त्याच्या मागण्या निर्माण होत आहेत. तरी हिंदू समाजाने आपल्याला काय हवे आहे याचा व्यवस्थित विचार करायला हवा. हिंदू संघटनांनी उगाच स्वतःला कट्टर वगैरे ठरवण्याऐवजी हिंदूहिताचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. हिंदू मतदार राजकीयदृष्ट्या जागृत झाला तर संपूर्ण भारतवर्षात एका राजकीय पक्षाचा प्रभाव निर्माण होईल असे सावरकर म्हणाले होते ते आता खरे ठरले. इकॉनॉमिक अॅंड पोलिटिकल विकलीमध्ये सुहास पळशीकर यांनी एक लेख लिहिला आहे. ‘इंडियास सेकंड डॉमिनेंट पार्टी सिस्टिम’ असा या लेखाचा मथळा आहे. त्यात पळशीकर लिहितात, ‘नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व हिंदू समाजाला राजकीयदृष्ट्या जागृत करत आहे.’

राजकारणाचे हिंदूकरण समजण्याची गरज

ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. पण एकट्या मोदींवर सगळा भार देऊन चालणार नाही. हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. मोदींना मते देऊन आपले कर्तव्य संपत नाही. तर ती कर्तव्याची सुरुवात ठरते. शक्य होईल तेव्हा जागोजागी हिंदूहिताचे कार्यक्रमे राबवले पाहिजेत आणि आपल्या मागण्या निश्चित केल्या पाहिजेत. शिवरायांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज असा करावा अशी मागणी महाराष्ट्रातून होत असते. या मागणीतून हिंदू समाज कसा जागृत नाही हेच दिसते. कारण शिवरायांचे कार्य आपण लक्षात घेत नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख झाला पाहिजे. कारण शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते. पुढे जाऊन यास सावरकरांनी हिंदूराष्ट्र म्हटले. राजकारणाचे हिंदूकरण म्हणजे काय, हे आपण समजून घेतले पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.