पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये- रणजित सावरकर

187

आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा इतिहास विसरू नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते, ते तेथून का स्थलांतरित करावे लागले, तेथे कोणते अत्याचार झाले, याचा इतिहास प्रदर्शित केला पाहिजे. हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. जेव्हा हिंदू तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री सिद्धनाथ नारायण देवस्थान सभागृह, काणका, म्हापसा येथे प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी रणजित सावरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय बजरंग दलाचे नितीन फळदेसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांची उपस्थिती होती.

‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना काळाची गरज

रणजित सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर अधिवेशनाला प्रारंभ झाला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे म्हणाले, ‘‘गोमंतक ही हिंदूंची भूमी आहे. गोमंतकाचा खरा इतिहास जनतेसमोर यावा आणि येथील परंपरा, संस्कृती आदींचे संरक्षण व्हावे, यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ही काळाची गरज आहे.’’ ‘‘पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या माध्यमातून गोमंतकीय हिंदूंवर केलेले अत्याचार ‘गोवा फाईल्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यात आले आहे. गोमंतकियांवर ‘इन्क्विझीशन’ लादून क्रूर अत्याचार करणारा फ्रान्सिस झेविअर हा ‘गोयंचो सायब’ कसा होऊ शकतो?’’, असे राष्ट्रीय बजरंग दलाचे नितीन फळदेसाई म्हणाले.

विविध विषयांवर मार्गदर्शन

अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात ‘परशुराम गोमंतक सेने’चे अध्यक्ष शैलेंद्र वेलींगकर यांनी ‘गोव्यात धर्मांतर रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आणि राज्यात धर्मांतर बंदी कायदा आणण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. अधिवेशनात तृतीय सत्रात ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्मितीसंबंधी हिंदूंच्या मागण्या’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जयेश थळी म्हणाले, ‘‘हिंदूंना मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले गेले पाहिजे.’’ अधिवेशनात सामाजिक माध्यमातून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य करणारे ‘युगांतर’चे अभिदीप देसाई यांनी मार्गदर्शन केले. अभिजीत देसाई म्हणाले, ‘‘आजची पिढी ही सामाजिक माध्यमावर आधारित असल्याने आपण सामाजिक माध्यमाद्वारे सण, संस्कृती आणि हिंदुत्वाचे रक्षण यांविषयी जागृती केली पाहिजे.’’ तत्पूर्वी १२ नोव्हेंबर या दिवशी गोमंतक मंदिर महासंघ आणि गोव्यातील मंदिरांचे विश्वस्त यांना मार्गदर्शन करतांना हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, ‘‘रस्त्याचे रूंदीकरण करताना एखादे मंदिर अडचणीचे ठरले, तर ‘बुलडोझर’ लावून ते पाडले जाते; परंतु अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे अडचणीची ठरल्यास त्याचे स्थलांतर कायदेशीरदृष्ट्या करण्यात येते. मंदिरांच्या बाबतीत असा दुजाभाव का? यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केला पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.