तुम्हाला पक्षाचे नीट काम करायचे नसेल तर पद सोडा आणि चालते व्हा, पदावर कशाला राहता? अशी तंबी राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील बांद्रा एमआयजी क्लब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीत राज ठाकरेंनी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडसावले.
विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. यावेळी गट अध्यक्षांच्या नेमणुकी न झाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत जाऊन त्यांची काम करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी काळात सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिलेत.
(हेही वाचा – जानेवारीपासून बोंबलायचंय म्हणून सध्या घशाला आराम देतोय, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण)
दरम्यान, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या बैठकीत संवाद साधणार आहेत. त्यासोबत २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे, त्याच्या तयारीचाही आढावा घेतला जाणार आहे. मनसेने यापूर्वीच निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. डिसेंबरपासून राज ठाकरे दौऱ्यावर निघणार असून सुरुवातीला ते कोकण विभागाचा दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community