एकाच क्रमांकावर मिळणार इमारतीची संपूर्ण कुंडली

140

मुंबई महानगरातील इमारतींना दिलेल्या वेगवेगळ्या परवानग्या व नागरी सेवा-सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येणार असून त्याच्या प्रशासकीय पातळीवरील पहिल्या टप्प्याचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त , उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

( हेही वाचा : तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले आहे का? स्थूलपणा कमी करायला शस्त्रक्रिया करण्यासाठी विमा कंपन्यांची टाळाटाळ)

महानगरपालिकेच्या या सर्व खात्यांचा कारभार यापूर्वीच ऑनलाईन झालेला आहे. वेगवेगळ्या परवानग्या देताना व सेवा-सुविधा पुरवताना, एकच इमारत ही महानगरपालिकेच्या विविध खात्यांच्या संगणकीय प्रणालीत त्या-त्या खात्याच्या स्वतंत्र क्रमांकाने नोंदवली जाते तथा संदर्भित केली जाते. स्वाभाविकच, नागरिकांना प्रत्येक खात्याच्या स्वतंत्र प्रणालीमार्फत परवानग्यांची माहिती प्राप्त करताना त्या-त्या विभागाचा संदर्भ क्रमांक माहीत असणे आवश्यक ठरते. म्हणजेच एकाच इमारतीचे विविध परवानग्या व सेवांचे संदर्भ क्रमांक त्या-त्या इमारतीतील रहिवाशांना तथा गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संदर्भित करावे लागतात.

डिजीटल युगात प्रत्येक गोष्टीसाठी तयार होणारा ओळख क्रमांक आणि पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी होणारी नागरिकांची कसरत लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांच्या सोयीसाठी मायबीएमसी बिल्डिंग आयडी म्हणजेच ‘इमारत ओळख क्रमांक’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. थोडक्यात, एकाच इमारतीचे विविध खात्यातील परवानगी व सेवांविषयक संदर्भ क्रमांक त्या इमारतीच्या ‘इमारत ओळख क्रमांका’शी (Building UID) जोडण्याकरिता मायबीएमसी बिल्डिंग आयडी (MyBMC Building ID) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

असे आहे इमारत ओळख क्रमांक प्रकल्पाचे स्वरुप

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रत्येक इमारतीला स्वतंत्र ओळख क्रमांक अर्थात बिल्डिंग आयडी देण्याची कार्यवाही काही वर्षांपूर्वीच सुरु केली आहे. मुंबईत आजघडीला सुमारे २ लाख ३३ हजार मालमत्ता कर पात्र इमारती आहेत. मालमता कर संकलनाच्या दृष्टीने यातील प्रत्येक इमारतीला १५ अंकी क्रमांक (SAC Number) देण्यात आला आहे. हा प्रकल्प राबवित असताना प्रशासनाच्या निदर्शनास आले की, ज्याप्रमाणे मालमत्ता कर संकलनासाठी संदर्भ क्रमांक दिला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक इमारतीला मिळणाऱ्या इतर परवानग्या व सेवा-सुविधांचे संदर्भ क्रमांक देखील एकमेकांशी जोडणे शक्य आहे. या विचारातूनच प्रत्येक इमारतीला एकच मुख्य ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने प्रत्येक करपात्र इमारतीच्या कर देयकावरील नमूद १५ अंकी लेखा क्रमांक (SAC Number) हा त्या इमारतीचा ‘इमारत ओळख क्रमांक’ (Building ID) आहे. तर उर्वरित खात्यांचे संदर्भ क्रमांक या मुख्य क्रमांकाच्या छत्राखाली जोडण्यात येत आहेत.

या प्रकल्प अंतर्गत सर्व ऑनलाईन प्रक्रिया इमारत ओळख क्रमांकाशी जोडून अद्ययावत स्वरुपात (Real Time Basis) एकत्रित करण्यात येत आहे. मुंबईकर नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या अंतर्गत कामकाजात प्रत्येक इमारती संदर्भातील सर्वंकष माहिती एकत्रितपणे सहज उपलब्ध होण्याकरिता, प्रत्येक इमारतीचा ‘इमारत ओळख क्रमांक’ (Building ID) सर्व संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परिणामी, प्रत्येक विभागाची संगणकीय प्रणाली कामकाजाच्या स्वरुपानुसार वेगळी असली तरी इमारत ओळख क्रमांक प्रकल्पामुळे या सर्व प्रणाली एकमेकांशी जोडल्या जातील. त्यातून प्रशासकीय कामकाज वेगवान, अचूक पर्यायाने पारदर्शक देखील होणार आहे. एवढेच नव्हे तर यातून महसूल वाढीसाठी मदतही होईल.

हा प्रकल्प ‘बीटा’ अर्थात सतत सुधारणा होणाऱया स्वरुपात प्रशासकीय पातळीवर जोडणीची कामे करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. जसजसा प्रकल्प पुढे सरकत जाईल तसतसा तो अधिक सुधारित होवून लवकरच मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल.

इमारत ओळख क्रमांक प्रकल्पाच्या अंमलबजावणीविषयी

मायबीएमसी बिल्डिंग आयडी (MyBMC Building ID) प्रकल्पात, पहिल्या टप्प्यात दुकाने व आस्थापना, व्यापार/आरोग्य परवानग्या, करनिर्धारण, जल जोडणी यांच्या संगणकीय प्रणाली एकत्रित करण्यात येत आहेत. त्यानंतर उर्वरीत खाती जसे की, इमारत प्रस्ताव, अग्निशमन, अनधिकृत/ मोडकळीस आलेल्या बांधकामांवरील कारवाई, झाडांची छाटणी, घनकचरा, मलनिसारण जोडणी यांच्या संगणकीय प्रणाली ‘इमारत ओळख क्रमांक’शी जोडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या कर निर्धारण, जलजोडणी, दुकाने व आस्थापना, व्यापार अनुज्ञापन, आरोग्य अनुज्ञापन ह्या विभागांच्या ऑनलाईन परवानगी व सेवा वापरताना नागरिकांनी योग्यरितीने इमारत क्रमांकाची (Building ID) नोंद केली असल्यास त्या इमारतीसंदर्भातील माहिती मायबीएमसी बिल्डिंग आयडी (MyBMC Building ID) प्रणालीवर तात्काळ उपलब्ध होवू शकेल.

मायबीएमसी बिल्डिंग आयडी (MyBMC Building ID) प्रणालीमध्ये नागरिकांना गुगल मॅपसदृश्य सुविधेचा अनेक पद्धतीने उपयोग करुन आपली इमारत उपग्रहीय नकाशावर शोधता येईल. त्यावर क्लिक केल्यावर महानगरपालिकेच्या १२ विभागांची विशिष्ट इमारतीच्या संदर्भातील मूलभूत माहिती दिसणार आहे. उदाहरणार्थ, महानगरपालिकेच्या करनिर्धारण खात्यात आपल्या इमारतीच्या वापरातील एकूण सदनिका, गाळे, मजले, आपल्या इमारतीत असलेले व्यापार/आरोग्य अनुज्ञापन पत्रे, दुकान व आस्थापना नोंदणी, जलजोडणी क्रमांक, त्यांचा वापर, इमारत प्रस्ताव विभागामार्फत देण्यात आलेल्या मंजूरी, नकाशे, अनधिकृत/ मोडकळीस आलेल्या बांधकामाबाबत सुरू असलेली कारवाई इत्यादीबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होऊ शकेल.

एवढेच नव्हे तर, या प्रणालीद्वारे नागरिक विविध परवानगी अर्ज/ नूतनीकरण तसेच देयकांचा भरणा देखील करु शकणार आहेत. ही प्रणाली नागरिकांसाठी उपलब्ध केल्यानंतर मुंबईकर नागरिक मायबीएमसी बिल्डिंग आयडी (MyBMC Building ID) लिंकद्वारे त्यांच्या इमारतीचा ‘इमारत ओळख क्रमांक’ (Building ID) चे स्टिकर डाऊनलोड करुन इमारतीमधील रहिवाशांच्या माहितीसाठी इमारतीच्या दर्शनी भागी लावू शकतील. तसेच आपल्या इमारतीशी जोडणी केलेली माहिती पाहू शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.