मुंबईत सध्या गोवरची साथ वाढू लागली असून कोविड काळांमध्ये या गोवर प्रतिबंधक लस अनेकांनी घेतली नसल्यानेच ही साथ पसरली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेकांनी गोवरची एकच लस घेतली असून काहींनी तर दोन्ही लस घेतलेल्या नाहीत. त्यामुळे तातडीने गोवरची लस देण्याची मोहिम राबवली जात असून शुन्य ते दोन वर्षांपर्यंत तब्बल २० हजार बालकांनी गोवरची लस घेतली नसल्याचे सर्वेमध्ये दिसून आले असल्याने यासर्वांचे तातडीने लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
( हेही वाचा : मुंबईत गोवरचे संशयित रुग्ण वाढले; भार पालिकेच्या रुग्णालयांवर)
मुंबईत गोवरचे १४२ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ९०८ एवढी झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे एकूण सात संशयित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गोवरमुळे मृत्यू झाला याची निश्चित माहिती मृत्यू चौकशी समितीच्या निष्कर्षानंतर त्यांची नोंद कन्फर्म गोवरमुळे मृत्यू असे नोंद होईल,असे डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले. गोवरचे संशयित रुग्णा सध्या भायखळा (ई ) गोवंडी,मानखुर्द, शिवाजीनगर,देवनार (एम-पूर्व), चेंबूर (एम-पश्चिम) वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व (एम-पूर्व) कुर्ला (एल) धारावी माहिम दादर (जी -उत्तर), मुलुंड (टि) मालाड (पी- उत्तर), वडाळा (एफ उत्तर) या भागांमध्ये आहेत. ज्या भागांमध्ये सध्या हे रुगण आढळून येत आहेत,त्या भागांमध्ये बालकांना गोवरचे लसीकरण पालकांनी करून घेण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे या लसीकरणाची अतिरिक्त मोहिम राबवून ते पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या यासर्व विभागांमध्ये घरोघरी जावून पाहणी केली जात असून ज्या बालकांना ताप व अंगावर पुरळ उठला असेल त्यांना संशयित रुग्ण म्हणून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. यासाठी कस्तुरबा रुग्णालयांमध्ये ८३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय गोवंडी शताब्दी आणि घाटकोपर राजावाडी रुग्णालयातही खाटांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आवश्यक भासल्यास प्रमुख रुग्णालयांमध्येही व्यवस्था केली जाईल,असे गोमारे यांनी सांगितले. शिवाय शिवाजीनगर येथील प्रसुतीगृहांमध्ये मुलांवर उपचार करण्याची सुविधा दिली जात असल्योही त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी संशयित रुग्णांवर घरी किंवा आवश्यक भासल्यास रुग्णालयांमध्ये दाखल केले जाईल. यासाठी २४ विभागातील वॉर रुम सक्रीय करून रुग्णांना गरज भासल्यास वाहन उपलब्ध करून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे घरोघरी भेटी देऊन सक्रीय संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे.
कोविड काळामध्ये गोवर लसीकरण न झाल्यानेच हे प्रमाण वाढले असावे अशी शक्यता वर्तवली जात असून लसीकरणाची मोहिम तीव्र केली जाईल. यासाठी मनुष्यबळाची संख्याही संबंधित विभागांमध्ये वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जे संशयित रुग्ण आहेत त्यांना विटामिन ए चे दोन डोस देण्यात येत आहेत, जेणेकरून त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल. आणि ज्यांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नाही त्यांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या शुन्य ते २ वयापर्यंतच्या २० हजार मुलांचे लसीकरण झालेले नाही. काहींचे एक तर काहींनी दोन लस घेतलेल्या नाहीत,त्या सर्वांचे लसीकरण केले जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली. ९ ते १६ महिने या कालावधीत पहिली लस आणि १६ महिन्यांनंतर दुसरी गोवरची लस घेणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community