मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावानंतर शिवसेना दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले. पण ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात येत आहे. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन्ही गटांना दिली मुदत
निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 12 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आयोगाला देण्यात येणा-या कागदपत्रांची परस्परांमध्ये देखील देवघेव करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना केल्या आहेत. 23 नोव्हंबरपर्यंत गटांकडून कोणतीही कागदपत्रे सादर न झाल्यास त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसल्याचे मानण्यात येईल आणि सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः 10वी व 12वीच्या परीक्षांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 2023 च्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार)
ठाकरे गटाची याचिका फेटाळली
पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी उच्च न्यायालयाकडून ही याचिका फेटाळण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयात न्यायालय कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहणार आहे.
Join Our WhatsApp Community