श्रद्धा वालकर हत्याकांडाबाबत संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याला गंभीर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून होत आहे. याच प्रकरणाबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भर चौकात फाशी द्या
महाराष्ट्रातील मुलीची ज्या पद्धतीने हत्या झाली ती अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने त्या मुलीचे तुकडे करुन तिला मारण्यात आलं आहे ते अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. अशा प्रकारे हत्या करणा-या नराधमांवर खटले देखील चालवू नयेत. जे परिस्थितीजन्य पुरावे आता समोर येत आहेत त्यांच्या आधारे अशा नराधमांना भर चौकात फासावर चढवले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी श्रद्धा हत्याकांडाबाबत दिली आहे. तसेच या प्रकरणावरुन कोणी राजकारण करू पाहत असेल तर ते चुकीचं आहे, असे देखील संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.
(हेही वाचाः श्रद्धाची हत्या नेमकी झाली कधी? मित्राच्या दाव्याने वाढला संभ्रम)
मुलींनी सावध होण्याची गरज
त्या मुलीच्या कुटुंबीयांचा आक्रोश समजण्याची गरज आहे. त्यामुळे मुलं कोणत्या धुंदीमध्ये जगतायंत आणि आपला जीव गमावून बसतायंत हे आज पुन्हा एकदा कळलं. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील मुलींनी खूप सावधपणे जगण्यास शिकण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांची फसवणूक होऊन अशा विकृतींना त्या कधीही बळी पडणार नाही, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community