सोशल मीडियावर आपले व्हिडिओ तयार करून अनेक जण रातोरात स्टार झाले. या सोशल मिडियावर रिल्स बनवून अनेकांना लोकप्रियता मिळाली. मात्र भारत जोडो यात्रेत केजीएफ चित्रपटाच्या संगीताची नक्कल केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर सहकाऱ्यांवर कॉपीराईटच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही देखील सोशल मिडियावर रिल्स बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण असा प्रकार तुम्ही केल्यास तुमच्यावरही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
(हेही वाचा – एलॉन मस्कला ‘त्या’ निर्णयाचा होतोय पश्चाताप! ट्विट करून म्हटले…)
तुम्हाला हे माहिती आहे का, कॉपीराईट संरक्षण करण्यासाठी कॉपीराईट अॅक्ट 1957 हा कायदा आहे. या कायद्यानुसार, अस्सल कामांची नक्कल करता येत नाही. प्रताधिकाराचा हक्क संबंधित कंटेन्टच्या निर्मात्यास असतो. मात्र निर्मात्याच्या कर्मचाऱ्यासही हा हक्क मिळू शकतो. एखादा कंटेन्ट तुम्ही स्वतः निर्माण केला असेल अथवा त्याचे हक्क असतील तरच तुम्ही या कायद्याचा वापर करू शकतात. यासाठी कंटेन्टच्या मालकीचे योग्य दस्तऐवज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
कॉपीराईट म्हणजे काय
कोणतीही बौद्धिक संपदा वैयक्तिक मालकीची असते. या संपदा किंवा साहित्याची कोणी चोरी केली तर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा होतो. उदा. एखाद्या लोकप्रिय अल्बममधील गाणी दुसरा कोणी व्यक्ती वापरत असेल तर ती एक प्रकारची चोरीच मानली जाते. त्यावेळी कॉपीराईट उल्लंघनाचा कायदा लागू होतो. कोणतेही लेखन, मजकूर, संगीत आणि चित्रपच यांवर मालकाचा कायदेशीर अधिकार असतो. त्याचा कोणताही वैयक्तिक वापर केला जाऊ शकतो, पण व्यावसायिक वापर केल्यास कॉपीराईटचे उल्लंघन होते.
नुकतेच,काँग्रेसने केजीएफचे संगीत आपल्या प्रचार व्हिडिओमध्ये वापरले होते. त्यासाठी त्यांनी संगीत निर्मिती करणाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे येथे थेट कॉपीराईट उल्लंघन झाले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
असा करा सोशल मिडियाचा वापर
इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या सोशल मिडियावर रिल्स आणि शॉर्ट्समध्ये संगीत देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म काही इनबिल्ट म्युझिक कॅटलॉग देतात. त्याचे अधिकार या प्लॅटफॉर्म्सनी खरेदी केलेले असतात. ते वापरल्यास प्रताधिकाराचे उल्लंघन होणार नाही. त्यामुळे तेच संगीत वापरल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
Join Our WhatsApp Community