आरेतील युनिट क्रमांक १५ मधून सलग दुस-या दिवशी बिबट्याला वनाधिका-यांनी जेरबंद केले. दिवाळीत दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी आतापर्यंत पाच बिबट्यांना वनाधिका-यांनी पकडले होते. त्यापैकी बुधवारी सकाळी जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्याने इतिका लोट या दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची खात्रीलायक बातमी आहे. सी५७ या अंदाजे साडेतीन वर्षांच्या मादी बिबट्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
आरेतील युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला झाला होता. त्यानंतर २६ आणि ३० ऑक्टोबर पाठोपाठ मंगळवारी दोन आणि बुधवारी पहाटे युनिट क्रमांक १५ मध्ये व नजीकच्या भागांत लावलेल्या पिंज-यात वनविभागाने पिंजरे लावले होते. त्यात पाच बिबटे अडकले. या दरम्यान युनिट क्रमांक १५ येथील तबेल्याबाहेर उभ्या असलेल्या माणसावर बिबट्याने नख मारुन पळ काढला होता. गेल्या आठवड्यात आदर्श नगर येथे महिलेवरही बिबट्याचा हल्ला झाला. या घटनाक्रमानंतर मंगळवारी पकडलेल्या दोन बिबट्यांपैकी मादी बिबट्याला वनाधिका-यांनी तातडीने रात्रीच नैसर्गिक अधिवासात सोडून टाकले. दुसरी मादी बिबट्या अद्यापही वनाधिका-यांच्या पिंज-यातच आहे. बुधवारी सकाळी वनाधिकारी शोध घेत असलेलीच मादी बिबट्या पकडली गेल्याने आता आरेत माणसांवर हल्ले कमी होतील, अशी आशा वनाधिका-यांना आहे.
( हेही वाचा: Body Shaming काय असते? ते आता शाळेत शिकवले जाणार )
Join Our WhatsApp Community