राज्यातील विनाअनुदानित शाळांना राज्य सरकार अनुदान देणार आहे. ६० हजार शिक्षकांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिली. २० ते ४० टक्के आणि ४० ते ६० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला यश मिळाले आहे. याविषयी केसरकर म्हणाले, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून, त्यांच्यासाठी १ हजार १६० कोटींचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले आहे. पुढच्या आठवड्यात या सविस्तर प्रस्तावाची छाननी करून याबाबतचा शासननिर्णय लवकरच जारी केला जाईल. एकंदरीत पात्रता पूर्ण करू शकल्या नाहीत, अशा शाळा वगळून आम्ही सर्वच्या सर्व शाळांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
साठ हजार शिक्षकांना लाभ
शिक्षकांसाठीच्या पॅकेजबद्दलही ठरवले असून त्यावर चर्चाही झाली. याची घोषणा पावसाळी अधिवेशनात मी केली होती. तेव्हा मी सांगितले होते की, अनेक वर्षे जे शिक्षक वंचित राहीले आहे त्यांच्यासह सर्वांचे निर्णय होतील. शिक्षकांना आंदोलन करू नका, असे आम्ही सांगितले होते. विधानसभेत, विधानपरिषदेत आम्ही जी घोषणा करतो ती आमच्यावर बंधनकारक असते, अन्यथा हक्कभंग होतो. कॅबिनेट बैठकीत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा होत नाही, तोवर कुठलीही घोषणा करता येत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मी घोषणा करीत आहे. त्यांनीच मला घोषणा करण्याचे सांगितले. लाभार्थी शिक्षकांची संख्या साठ हजार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी आम्ही सर्वांना न्याय देऊ शकलो, याचा आनंद आहे, असेही केसरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community