अरबी समुद्राची गाज आणि खारे वारे अंगावर झेलत गेली अनेक दशके पर्यटकांना सेवा देणाऱ्या तारापोरवाला मत्स्यालयाची वाट कोस्टल रोडने अडविली आहे. किनारी रस्ता प्रकल्पाचे काम सुरू असल्याने ही वस्तू खुली करण्यात अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मत्स्यपर्यटनाला खीळ बसली असून, दिवसाकाठी २ ते ३ लाखांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.
( हेही वाचा : सावरकरांचा अपमान म्हणजे देशभक्त भारतीयांचा अपमान – आशिष शेलार)
समुद्रातील, गोड्या पाण्यातील, तसेच उष्ण कटिबंधातील लहान शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्याने तारापोरवाला मत्स्यालयाला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. कोरोनापूर्वी येथे दिवसाला दोन हजार, तर साप्ताहिक सुटीला ३ ते साडेतीन हजार पर्यटक भेट द्यायचे. त्यातून दिवसाला २ ते ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळायचे. महिन्याला ५० लाख, तर वर्षाला हा आकडा सहा कोटीच्या घरात पोहोचायचा.
आता उत्पन्नाचा स्रोत पूर्णतः बंद झाला असून, मत्स्यालय सांभाळण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून वर्षाकाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. मत्स्यालयाच्या प्रवेशद्वारालगत खोदकाम करण्यात आल्याने पर्यटकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही, बस थांबण्यासाठी जागा नाही असे चित्र आहे. पर्यटकांना प्रवेश देण्याजोगी स्थिती नसल्याने तारापोरवाला मत्स्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकान्याने दिली.
उत्पन्न नाही, तरी गेल्या खर्च सुरूच
तारापोरवाला मत्स्यालयालाचे उत्पन्न बंद असले तरी, ते सांभाळण्यासाठी वर्षाकाठी दीड कोटी रुपयापर्यंत खर्च करावा लागत आहे. माशाचे खाद्य, वीज देयक, पाण्याच्या टाक्यांची सफाई, खऱ्या आणि गोड्या पाण्याच्या गाळण यंत्राची डागडुजी, इतर यंत्राची दुरुस्ती, पाइप लाइन, गंजलेल्या ठिकाणी रंगकाम आणि त्यासाठीच्या मनुष्यबळापोटी हा खर्च करावा लागत आहे.
किती प्रकारचे मासे आढळतात?
- लेपटी, किळीस, पाकट, हेकरू, तांब, खडकपालू, शेवंड, समुद्रसाप, जेलीफिश आदी स्थानिक प्रजाती
- देशभरातून तसेच परदेशातून आयात केलेले अतिशय दुर्मिळ डॅम्सेल, बटर फ्लाय, एंजल, ट्रिगर, याम, स्क्चिरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टॅग, कोंबडा, व्हिम्पल, मूरीश, सी नीमोन
- गोड्या पाण्याच्या विभागामध्ये अरोवाना, बेडूक, सिक्चिड, पिरान्हा, कॅट फिश, रोहू, कटला, मृगळ असे शोभिवंत मासे व जलजीव
- लहान टाक्यांमध्ये गोल्ड फिश. एंजल, गोरामी, बार्ब, शार्क, फ्लॉवर हॉर्न, सिक्लिड, पॅरंट, ट्रेटा, गप्पी, कोळंबी, डिस्कस या प्रजातींचे आकर्षक मासे पाहता येतात.
- मत्स्यालय बंद असल्यामुळे संख्या कमी आहे, शिवाय नव्या प्रजाती मागविण्यात आलेल्या नाही.
तिकीट किती?
- प्रौढ – ६०
- १२ खालील मुले – २०
- विद्यार्थी – ३०
- शैक्षणिक संस्था, दिव्यांग व्यक्ती, सैनिक व प्रशासकीय सेवेतील निवृत कर्मचारी, शासकीय कर्मचारी – ४०
- साधा कॅमेरा – ५००
- डीएसएलआर कॅमेरा – २ हजार
- व्हिडीओग्राफी – ५ हजार