शरद पवार म्हणतात, सावरकरांप्रति अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत!

159

राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात येऊन ३ दिवस उलटले तरी प्रसिद्ध मिळत नाही म्हणून शेवटी राहुल गांधी यांची पातळी घसरली आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर महाराष्ट्रात गदारोळ माजला आहे, यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाची चांगलीच गोची झाली आहे, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे समर्थ करणे अवघड बनले, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने या वादापासून दूर राहणे पसंत केले असले तरी सोशल मीडियात मात्र शरद पवारांनी वीर सावरकर यांच्यावर जाहीर भाषणात जी स्तुतीसुमने वाहिली, त्यांचे भरभरून कौतुक केले आहे, त्या भाषणाची व्हिडीओ क्लिप जोरदार व्हायरल होऊ लागली आहे. या भाषणात शरद पवार यांनी, सावरकरांप्रति तुमच्या-माझ्या अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत!’, असे म्हटले आहे. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले होते शरद पवार? 

सावरकरांच्या विचारसरणीतून सशस्त्र क्रांतीतून स्वातंत्र्य निश्चितपणे मिळाले, हे मान्य करायला पाहिजे. १८५७च्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीची ठिणगी पेटली. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामधून प्रेरणा घेऊन सावरकरांनी वयाच्या १८व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची धाडसी भूमिका घेतली होती. मित्र मेळ्याची स्थापना करणे असो, नंतरच्या काळात उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर त्याठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघटना वाढवण्याची त्यांची भूमिका असो, उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर जवळपास ५० वर्षांची कठीण अशी शिक्षा भोगण्याची त्यांची कामगिरी असो, ती प्रत्येक कामगिरी नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. हे काम त्यांनी अत्यंत जिद्दीने, कष्टाने आणि चिकाटीने केले. या कष्टामुळे आणि त्यागामुळे त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली होती. घरादारावर ब्रिटिशांनी नांगर फिरवला, मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही दिलेली पदवी परत घेतली. बॅरिस्टर झाल्यानंतरही बॅरिस्टर पदवी लंडनच्या विद्यापीठाने नाकारली. एखाद्याच्या जीवनात शोक निर्माण व्हावा अशी परिस्थितीत त्यांच्या जीवनात निर्माण झाली होती. पण शोकाला श्लोकत्व देण्याची भूमिका त्या काळात सावरकरांनी घेतली. त्याचे महाकाव्य त्यांनी लिहून संपूर्ण भारतवासीयांसमोर आणले. त्यामुळे सावरकर यांच्या प्रति तुमच्या-माझ्या अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.