गोवंडीतील गोवरबाधित मुलांना तातडीने उपचार मिळावे तसेच संशयित रुग्ण वेळेवर ओळखले जावे म्हणून तब्बल ४० तरुणांची टीम आता पालिका आरोग्य विभागाला मदत करायला सरसावली आहे. या तरुणांनी आपल्या समुदायातील लोकांना घरोघरी जाऊन गोवरची माहिती देण्यासही सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, आरोग्यसेविका तसेच वस्तीपातळीवरील तरुण-तरूणी आता गोवंडीतील गल्लोगल्ली फिरुन मदत करु लागले आहेत.
( हेही वाचा : गोवंडीत बाळांचे मृत्यूसत्र सुरुच, संशयित गोवरबाधित मृत्यूंची संख्या वाढली )
मनुष्यबळाचा प्रश्न उपस्थित झाल्याने पालिका अधिका-यांनी रुग्णालयातील इंटर्न्सची मदत घेतलेली असताना वस्तीपातळीवरील तरुणही दोन दिवसांपासून लसीकरण मोहिमेत सक्रीय झाले आहेत. आरोग्यसेविकांना सोबत घेऊन प्रत्येक वस्तीत घरात जाऊन प्रत्येक तरुण किमान २० घरांना भेट देत असल्याचे दिसून आले. काही घरांमध्ये आरोग्यसेविकांनाही येण्यास मज्जाव केला जात असताना वस्तीपातळीवरील तरुण घरी जाऊन बालकांना भेट देऊन त्यांना गोवरसंबंधी लक्षणे आहेत की नाही, हे तपासत होते. एका घरात वर्षभराच्या बाळाच्या अंगावर लाल चट्टे आढळले. बालिकेच्या पालकांची तरुणांनी समजूत घातल्यानंतर आरोग्यसेविकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले. बाळ शिवाजीनगर येथील नागरी आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवले गेल्याचे बोलले गेले. मात्र प्रत्यक्षात विभागातील कोणत्याही आरोग्य अधिका-यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली नाही.
आम्हांला प्रसिद्धी नको पण आमच्याच वस्तीतील मुले गंभीर आरोग्याच्या समस्येला सामोरे जात असताना आता ही लढाई आम्हा सर्वांची आहे, अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिली. लहान मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू, अशा निर्धार तरुणांनी केला.
Join Our WhatsApp Community