मुंबईचे सुशोभिकरण करण्याकडे महापालिकेने आता विशेष लक्ष दिले असून दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील रस्ता दुभाजकांवरील वाहतूक बेटेही फुलांच्या रोपट्यांनी बहरुन गेली आहे. या संपूर्ण रस्त्याचा दुभाजकच सध्या झेंडूंच्या फुलांनी बहरुन गेले आहेत. या दुभाजकांवरील वाहतूक बेटांवर फुल झाडांची रोपटी लावल्याने हा रस्ता सध्या भगव्या आणि पिवळ्या झेंडुंच्या फुलांनी सजून गेला आहे.
रस्त्यांच्या सुशोभिकरणात अधिक भर पडली
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील (शिवाजी पार्क) स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक लोटत असल्याने महापालिकेने या स्मृतीस्थळावर आकर्षक झाडांच्या रोपट्यांची सजावट केली होती. या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महापालिका जी उत्तर विभागाने येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरील रस्ता दुभाजकावरील वाहतूक बेटांवरील जुनी झाडांची रोपटी काढून त्याठिकाणी भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या फुललेल्या झाडांची रोपटी लावली. शिवाजी पार्कमधील संगीतकार वसंत देसाई चौक ते सी रामचंद्र चौकपर्यंत असलेल्या दोन सिग्नलमधील भागांमध्ये या फुललेल्या झेंडुंची रोपटी लावत या रस्त्यांच्या सुशोभिकरणात अधिक भर पडली आहे.
(हेही वाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर राहुल गांधींना ‘जोडे मारो’ आंदोलन )
रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरणासाठी झेंडुची रोपटी लावण्यात आली
जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या संकल्पनेतून सावरकर मार्गावरील रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरणासाठी झेंडुची रोपटी लावण्यात आली आहे. याबाबत सपकाळे यांना विचारले असता त्यांनी प्रायोगिक तत्वावर ही फुललेल्या झेंडुंची रोपटी लावण्यात आली आहे. ही रोपटी जास्त दिवस जगत नसली तरी या वाहतूक बेटावर ते किती दिवस जगतात यासाठी हा प्रयोग करण्यात आला असून यामुळे रस्ता दुभाजक आकर्षक आणि मनमोहक दिसतात. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला तर अन्य रस्त्यांच्या दुभाजकांवर फुलांची रोपटी लावली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community