वडाळा-नायगाव भागात गेल्या काही दिवसांपासून पाणमांजराचे दर्शन होत आहे. पाणमांजर रात्री किंवा सायंकाळी थेट चायनीजच्या दुकानावर येत असल्याने स्थानिकांमध्येही प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. मुंबईत व नजीकच्या समुद्रात पाणमांजराचा वावर नसताना थेट वडाळा-नायगाव परिसरात कुठून पाणमांजर आले, याचा शोध घेतला जात आहे. याबाबत वनधिका-यांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरीही चायनीज पदार्थ खाणा-या पाणमांजर मुंबई भागांत तब्बल स्वातंत्र्यानंतर दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
ब-याच काळापासून मनुष्यवस्तीच्याजवळ राहते
१० नोव्हेंबरच्या आसपास वडाळा शिवडी येथील निर्जळ भागांत सुरुवातीला पाणमांजराचा स्थानिकांना वावर दिसला. स्थानिकांकडून वनविभागाला तक्रारही केली. पाणमांजर वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित असल्याने तातडीने वनाधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मात्र पाणमांजर आढळले नाही. हळूहळू पाणमांजराचा वावर वाढू लागला. माणसांना पाहताच पाणमांजर पळून जातो. मात्र चायनीजच्या दुकानावर येणा-यांना त्याचे सहज दर्शन होत आहे. तब्बल दहा दिवसांपासून नायगाव परिसरांतील स्थानिकांना पाणमांजर दिसत असल्याची तक्रार आहे. पाणमांजर हा स्वभावाने लाजाळू प्राणी असतो. त्याचा मनुष्य वस्तीजवळील वावर पाहता पाणमांजर ब-याच काळापासून मनुष्यवस्तीच्याजवळ राहत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी पाणमांजर आलेच कसे, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. या पाणमांजराला तत्काळ पकडण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
(हेही वाचा हिंदू देवतांची विटंबना करणारे हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकीचे कार्यक्रम रद्द!)
Join Our WhatsApp Community