भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे अनुयायी तथा भिमसैनिक चैत्यभूमीवर येत असल्याने त्यांना चांगल्याप्रकारची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) दोन ठिकाणी वॉटरप्रुफ मंडप आणि टेहळणी मनोरे उभारले जाणार आहेत. आजवर या मैदानामध्ये कापडी मंडप उभारले जात होते, परंतु यंदा प्रथमच वॉटरप्रुफ मंडप उभारले जात आहेत. शिवाय रांगेतील अनुयायांना महापालिका प्रथमच मिनरल पाणी आणि बिस्कीट वाटप करणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोविडनंतर प्रथमच महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मागील दोन वर्षे बाबासाहेबांच्या अनुयायांना येता आले नाही. परंतु यंदा कोविडचे सावट दूर झाल्यानंतर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन होत असल्याने मोठ्याप्रमाणात अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अनुयायांच्या सुविधेकरता शिवाजी पार्क येथे मंडप तसेच इतर प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु बदलत्या वातावरणामुळे पाऊस केव्हाही कोसळत असल्याने अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास चैत्यूभूमीवर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा वॉटरप्रुफ मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने अशा प्रकारच्या वॉटरप्रुफ मंडप उभारण्याची मागणी आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार महापालिका जी -उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी या मैदानात वॉटरप्रुफ मंडप व टेहळणी मनोरे उभारण्यासह व इतर सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले होते.
(हेही वाचा हिंगोलीतही ‘आफताब’; हिंदू तरुणीला धर्मांतर करण्यासाठी केले अत्याचार)
२०१७मध्ये पावसामुळे झालेली गैरसोय
त्यानुसार शिवाजी पार्क मैदानाच्या उत्तर व दक्षिण दिशेला हे मंडप उभारले जात आहेत. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी याबाबत बोलतांना प्रत्येकी ५० हजार चौरस मीटरचे हे वॉटरप्रुफ मंडप आहेत. यापूर्वी २०१७मध्ये महापरिनिर्वाण दिनी पाऊस पडल्याने अनुयायांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची मागणी आणि हवामान खात्यानेही जानेवारी २०२३ पर्यंत पावसाळा असण्याची शक्यता वर्तवली असल्याने याठिकाणी दोन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात येत असून अशाप्रकारचा मंडप प्रथमच उभारला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा महापालिकाही रांगेतील अनुयायांना पाणी, बिस्कीट
शिवाय चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांसाठी यंदा बिस्कीट आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेतील प्रत्येक व्यक्तीला महापालिकेच्यावतीने बिस्कीट आणि पाण्याच्या बॉटलचे महापालिकेच्यावतीने वाटप केले जाणार आहे. आंबेडकर अनुयायांना बिस्कीट आणि पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्याची ही वेळ असून यंदापासून हे वाटप करण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले.
समन्वय समितीची बऱ्याच वर्षांची मागणी मान्य
Join Our WhatsApp Communityयंदा चैत्यभूमीवर मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी अनुयायी येणार असल्याने वॉटरप्रुफ मंडप बांधावे ही समन्वय समितीची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती, ती मागणी यंदा प्रत्यक्षात येत आहे. याशिवाय, रांगेतील अनुयायांना मिनरल वॉटरचे बॉटल, दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची वैद्यकीय तपासणी, इंदू मिलमधील स्मारकाचे सुरु असलेल्या बांधकामाची माहिती मोठ्या स्क्रिनवर दिली जावी तसेच शासकीय मानवंदनाही दुरदर्शनच्या माध्यमातून लाईव्ह दाखवून चैत्यभूमीवर हेलिकॉफ्टरमधील पुष्पवृष्टी करावी अशाप्रकारची समन्वय समितीने केली होती. त्यानुसार महापालिका व शासनाने या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि दिपक केसरकर, मुख्यसचिव तसेच महापालिका आयुक्त यांच्यासह खासदार राहुल शेवाळे यांचे योगदान आहे.
– नागसेन कांबळे, सरचिटणीस, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समिती