सध्या सबंध देशामध्ये मनोरंजन करण्याची जबाबदारी काँग्रेसने आपल्या खांद्यावर घेतलेली दिसते. काँग्रेसच्या युवराजांच्या सभेत भारताऐवजी नेपाळचं राष्ट्रगीत लावलं जातं, यावरुनच काँग्रेस आता पूर्णपणे कामातून गेलेली आहे हे लक्षात येतं. युवराज राहुल भारत जोडो यात्रेत व्यग्र असताना सोनिया गांधींनी गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुजरात हे एक महत्वाचे राज्य आहे. अनेक वर्षांपासून भाजप-कॉंग्रेसमध्ये इथे चुरशीची लढत होत आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसचं गुजरातकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. केजरीवाल मात्र आपला प्रचार जोरदार करत आहेत.
आता कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या प्रचारकांची यादी पाहिल्यावर असं वाटतं की कॉंग्रेसने जिंकण्यासाठी नव्हे तर हरण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रमुख नावे आहेत. आता राहुल गांधी तर प्रचंड पराभूत नेते आहेत प्रियंका गांधींना देखील फारसा चमत्कार दाखवता आला नाही. त्यांच्या नाकाची मात्र खूप चर्चा झाली. त्यांचं नाक त्यांच्या आजीसारखं आहे, बाकी आजीचे गुण घ्यायला त्या विसरल्या ही गोष्ट निराळी.
वादग्रस्त वक्तव्य करण्यात तरबेज असलेले दिग्विजय सिंह सुद्धा या यादीत आहेत. अचानक झळकले आणि मोदींचा विरोध करुन थकून पुन्हा त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित झालेले जिग्नेश मेवाणी या यादीत आहेत. पराभूत नेता कन्हैया कुमार देखील आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आहेत. या सर्व नेत्यांना विशेष काही करता आलेलं नाही. अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही. आज महाराष्ट्र कॉंग्रेसची परिस्थिती बिकट आहे. एकेकाळी क्रमांक एकवर असलेला हा पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. गंमत म्हणजे शशी थरुर यांना या यादीतून वगळण्यात आले आहे.
आता या सर्व पराभूत वृत्तीच्या नेत्यांना घेऊन कॉंग्रेस गुजरात जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपसारख्या मोठ्या पक्षाचं आव्हान आहेच, परंतु आम आदमी पार्टी देखील सर्व शक्तीने गुजरातमध्ये उतरली आहे. आपकडे केजरीवाल हा चेहरा आहे. काँग्रेसकडे सध्या कोणताच चेहरा नाही. राहुल गांधींनी दाढी वाढवल्यामुळे वेगळा चेहरा सापडला असं विनोदाने म्हणता येईल. त्यापलीकडे कॉंग्रेसकडे काही नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सपशेल फसली त्यामुळे त्यांना सावरकरांचा आधार घ्यावा लागला. यातून वाद जरुर निर्माण झाला. पण मते कशी मिळणार? गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सावरकरांचा अपमान त्यांना भारी पडेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदूंना अधिक प्रिय आहेत.
तर कॉंग्रेस ज्या लोकांना स्टार म्हणत आहेत, ते मेन स्ट्रिममधले स्टार नसून बी ग्रेड चित्रपटतील कलाकारांप्रमाणे स्टार आहेत. फ्लॉप शो देण्याचा रेकॉर्ड राहुल गांधींच्या नावावर आहेच. म्हणूनच म्हणालो की काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचे स्टार केव्हाच फिरलेत. आता कॉंग्रेसला पूर्णपणे पाडल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत.
Join Our WhatsApp Community