छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधकांनी यावरुन भाजपवर निशाणा साधला असतानाच आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबबात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाचीही तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महाराजांशी कोणाचाही तुलना होऊ शकत नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्या संदर्भात अशाप्रकारे बोलले आहेत हे मला माहीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत, होते आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ते आदर्शच असतील. त्यामुळे महाराजांची बरोबरी किंवा त्यांची तुलना देशात किंवा राज्यात कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर आणि सन्मान हा संपूर्ण राज्याने आणि देशाने करायलाच पाहिजे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
(हेही वाचाः ‘जिभेला हाड नसले तरी डोक्यात मेंदू असतो’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन मनसेचा घणाघात)
राज्यपालांचे वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत असून, ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.