टी-20 विश्वचषकात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियातील अनेक खेळाडूंना संघात स्थान न देण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI)ने एक मोठा निर्णय घेतला असून, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संघ निवड समिती बरखास्त करुन नव्या समितीसाठी अर्ज मागवले आहेत. या नव्या समितीत भारताच्या माजी चार खेळाडूंचे नाव चर्चेत असून नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,नव्या निवड समितीसाठी भारताचे दोन माजी यष्टीरक्षक,एक माजी वेगवान गोलंदाज आणि एक माजी लेग स्पिनर अर्ज करू शकतात. तसेच मुख्य निवडकर्त्याच्या पदासाठी देखील या माजी खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)
हे खेळाडू अर्ज करण्याची शक्यता
भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया आणि समीर दिघे तसेच सलील अंकोला हे नव्या निवड समितीसाठी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात येत आहे. तसेच माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर हे देखील अर्ज करणार असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वेळी आगरकरची निवड समितीतील एंट्री थोडक्यात हुकली होती. त्याच्या जागी अभय कुरुविला याला निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले होते. याबाबत अधिकृत माहिती लवकरच मिळणार आहे.
मुख्य निवडकर्ता कोण?
बीसीसीआयच्या नियमानुसार, ज्या माजी खेळाडूला सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे तो निवड समितीत मुख्य निवडकर्त्याच्या खुर्चीवर बसू शकतो. या सर्व माजी खेळाडूंमध्ये नयन मोंगिया याने भारतासाठी सर्वाधिक 40 कसोटी आणि 140 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर शिवरामकृष्णन यांनी 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सलील अंकोलाने 1 कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने भारतासाठी खेळले आहेत.
Join Our WhatsApp Community