राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, राज्यपालांनी यासंदर्भात माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. या राज्यपालांना कुठेही न्या, पण हे राज्यपाल महाराष्ट्रात नको, अशी मागणी शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींना संजय राऊतांची चिंता!)
काय म्हणाले शिंदे गटाचे आमदार
भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल त्याचं राज्याच्या राज्यपालांनी एकेरी भाषेत उल्लेख करणं कितपत योग्य आहे, असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. यासह पुढे ते असेही म्हणाले की, ज्यांना छत्रपती म्हटले जाते त्यांना एकेरी भाषेत शिवाजी म्हणतात. शिवाजी जुने झाले. या राज्यपालांना कळायला पाहिजे की, शिवविचार हा कधी जुना होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येऊ शकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
ज्या राज्यपालांना आपल्या राज्याचा इतिहास माहित नाही, या राज्यपालांना राज्य काय आहे हे कळत नाही, त्यामुळे अशा व्यक्तीला राज्याच्या राज्यपाल पदावर ठेवून कोणताही उपयोग नाही. तर मराठी मातीतील माणसालाच राज्यपालपदी नियुक्त करावे, अशी विनंती भाजपच्या केंद्रीय सर्व नेत्यांना संजय गायकवाड यांनी केली आहे. तर या राज्यपालांना कोठे पाठवायचे आहे तिथे पाठवा, पण हे राज्यापाल महाराष्ट्रात नको असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
काय केले राज्यपालांनी वादग्रस्त विधान
कोणाला सुभाष चंद्र, कोणाला नेहरू, कोणाला गांधीजी चांगले वाटत असत. ज्याला जी व्यक्ती चांगली वाटत असेल तो त्या व्यक्तीचे नाव घेतो. आज तुम्हाला आदर्श शोधायचे असेल तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकतात. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण आहेत… तर डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील असे मला वाटते. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय, असे औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community