कुलाब्यातील या झोपडपट्ट्यांमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या होणार दूर

198

कुलाब्यातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या गणेशमूर्ती नगर, आंबेडकर नगर, शिवशक्ती नगर, मच्छिमार नगर, कफ परेडसह सुंदर नगरी झोपडपट्टी परिसरात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाणी समस्येवर आता मात केली जाणार असून या भागातील पाणी तुंबण्याची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी महापालिकेने पावसाळी पाण्याचा निचरा करणारी नवीन वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित…)

कुलाब्यातील समुद्र किनारपट्टीला वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आंबेडकर नगरमधील धोबीघाट रस्त्यावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या प्रणालीत सुधारणा करण्यासाठी ३०० व ६०० मि मी व्यासाची अनुक्रमे ३०० व १३० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. याशिवाय आंबेडकर नगरमधील शिव मंदिर गल्लीमध्ये तसेच डोअर स्टेप शाळेजव ३०० मि मी व्यासाची ३३५ मीटर व ३१२ मीटर लांबीची वाहिनी टाकली जाणार आहे.

तर गणेश मूर्ती नगर १ मधील गल्ली क्रमांक १६, १७, १८ व १९ सह गणेश मूर्ती नगर दोनमधील गल्ली ३, ७, ८, १० सह सेवा संघ जवळ ३०० मि मी व्यासाच्या अनुक्रमे ४५० व ६७० मीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. तर सुंदर नगरीमधील साईमंदिर सप्त शिंगर मंडळ येथेही ३०० मि मी व्यासाच्या २५० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार. याबरोबरच जगन्नाथ भोसले मार्ग येथील शिवशक्ती नगर मध्ये ३०० व ४५० मि मी व्यासाची अनुक्रमे ३६६ व १५० मीटर लांबीची वाहिनी टाकली जाणार आहे. तसेच याच मार्गावरील शिवसृष्टी मच्छीनगर २ पासून हनुमान मंदिर पर्यंतही ६०० मि मी व ३०० मि मी व्यासाच्या नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकल्या जाणार आहेत. याबरोबरच लाला निगम मार्ग, दर्यानगरी, जे एन नौरोजी स्ट्रीट आणि कोळी लेन क्रमांक २मध्येही ६००, ४५० आणि ३०० मि मी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिनीचे जाळे पसरले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याबाबतच्या कामांवर विविध करांसह सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी रिओना एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून हे काम पुढील आठ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा मागवताना ७ कोटी ३९ लाख ५१ हजार रुपयांचा अंदाजित दर निश्चित करून त्यासाठी निविदा मागवली होती, परंतु यासाठी पात्र ठरलेल्या कंपनीने ३१. ८६ टक्के उणे दराने अर्थात कमी दरांमध्ये हे काम मिळवले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.