‘स्वयंपूर्ण गोवा’ सारखी योजना महाराष्ट्रातही सुरू करणार – रवींद्र चव्हाण

145

गोवा सरकारतर्फे राबविण्यात येणारी ‘आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा योजना’ ही अतिशय अभिनव व प्रेरणादायी स्वरूपाची योजना आहे. या योजनेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशी अभिनव योजना महाराष्ट्रात लवकरच सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करू, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

( हेही वाचा : कुलाब्यातील या झोपडपट्ट्यांमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या होणार दूर)

गोवा सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या स्वयंपूर्ण गोवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या शिष्टमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सहभागी झाले. गोवा सरकारच्या नियोजन महासंचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाअंतर्गत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे. अंत्योदय, ग्रामोदय व सर्वोदय या तत्वांवर आधारीत असे या योजनेचे स्वरुप आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात येते. ही जबाबदारी पार पडणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हटले जाते. खेड्या पाड्यातील गावकऱ्यांना या योजनेच्या मार्फत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येतो. तसेच गावांच्या विकासासाठी शासकीय योजनांच्या मार्फत किंवा लोकसहभागातून आवश्यक उपक्रम अथवा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वयंपूर्ण मित्राच्या मार्फत राबविण्यात येत असून, सुमारे १८०० हून अधिक प्रकारची कामे या योजनेखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिकरित्या या योजनेकडे लक्ष असून या योजनेचा सातत्याने आढावाही वेळोवेळी घेण्यात येतो, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.