जन्मतः प्रोग्रेसिव्ह फॅमिलीअल इंट्राहेपॅटीक कोलेस्टेसिस (पीएफआयसी२)हा यकृताशी संबंधित दुर्मिळ आजार झालेल्या बालकावर परळ येथील खासगी रुग्णालयाने यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करुन नवे आयुष्य दिले. बालरोग यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता दशलक्ष लोकसंख्येमागे एक किंवा दोन बालकांना असते. मात्र वेळेवर उपचार मिळाल्यास बालकाचा जीव वाचतो. या अवघड यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वडिलांनीच आपल्या शरीरातील यकृताचा काही भाग आपल्या बाळासाठी दान केला. प्रत्यारोपण शस्रक्रियेच्यावेळी बाळाचे वय दोन वर्षांचे होते, असा दावा रुग्णालयाने केला आहे.
( हेही वाचा : कोकणातील बारसू रिफायनरीच्या यादीतून सोलगावचे नाव वगळले )
गेल्या महिन्यात १६ ऑक्टोबर रोजी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. विक्रोळीतील योगेश आणि सुप्रिया या दाम्पत्याच्या निभिष या तान्हुल्याला जन्मतःच पीएफआयसी-२ या आजाराचे निदान झाले. निभिषला जन्मानंतर कावीळही झाली. कावीळ गंभीर स्वरुपात पोहोचल्यास कित्येकदा यकृत निकामी होण्याचा धोका असतो. हेपॅटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. इरा शाह, डॉ. प्रज्ञा बेंदरे आणि प्रा. डॅरियस मिर्झा यांनी रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या या बाळावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. इरा शाह यांच्या माहितीनुसार, रुग्णाला चार वेळा अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्ण शारिरीकदृष्टया सक्षम नव्हता. त्यासाठी सुरुवातीला रुग्णाला सकस आहार द्या, असा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिला. रुग्णाचे वडिल यकृतदाता म्हणून तयार झाले. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला २८ दिवस अतिदक्षता विभागात उपचारांसाठी ठेवले गेले. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community