गोंदिया येथील शेतात दोन सारस पक्ष्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. शेतातून वीजप्रवाह जाणा-या तारेवर आदळून अंदाजे तीन-चार दिवसांपूर्वी दोन सारस पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका वनाधिका-यांनी घेतल्याचे समजते. या घटनेनंतर आता गोंदियात सारस पक्ष्यांची संख्या ३२ वर घसरली आहे.
नेमकी घटना काय?
कांचा गावातील आश्रम शाळेजवळील शेतात पीक कापणीसाठी गेलेल्या शेतक-याला सकाळी आठच्या सुमारास सारस पक्ष्यांचे मृतदेह दिसले. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. वनाधिकारी तसेच मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत सारस पक्ष्यांवर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली. वनाधिका-यांच्या माहितीनुसार, पक्ष्यांचा मृतदेह पाहता त्यांना वीजेचा धक्का तीन-चार दिवसांपूर्वीच लागला होता. ज्या भागांत सारस पक्षी मृत पावले त्या भागांत शेतकरी दररोज जात नसल्याने प्रकरण मंगळवारी उघडकीस आले.
महावितरणाच्या वीजप्रवाहामुळे पक्षांच्या होणा-या मृत्यूसंदर्भात अगोदरच न्यायालयीन प्रकरणात नुकसानभरपाई देणे मान्य केले आहे. मात्र याप्रकरणी सारस तसेच इतर पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी बर्ड डायव्हर्टर लावण्याची मागणीही पक्षीप्रेमींनी केली आहे.
( हेही वाचा: चंद्रपूरमधून वाघ जेरबंद! )
Join Our WhatsApp Community